उद्धव निमसे यांना तात्काळ अटक करण्याची उबाठाची मागणी !
पीडितांच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे !राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी !
नाशिक : नांदूर नाका परिसरात माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी प्राणघातक हल्ला करत दोघा युवकांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्राणघातक हल्ल्यातील सात संशयितांना अटक करण्यात आली असली तरी मुख्य संशयित आरोपी उद्धव निमसे फरार आहे निमसे यांना अटक करून पीडितांच्या कुटुंबाला संरक्षण देण्याच्या मागणीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले.
शुक्रवारी (दि.२२) संध्याकाळी सनी धोत्रे याचा निमसे गटातील दोन मुलांसोबत वाद झाला. यानंतर सनी धोत्रे, राहुल संजय धोत्रे, अजय कुसाळकर, शुभम तिडके आणि अल्ताफ शेख हे नांदूर नाका येथील मंदिराजवळ आले असता काही वेळातच पोलीस सनी धोत्रे आणि शुभम तिडके यांना तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते. मात्र, या दरम्यान माजी नगरसेवक उद्धव निमसे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आकाश धोत्रे यांना आम्ही इथले बाप आहोत, बाहेरून येऊन आमच्या गावात गुंडागर्दी कराल का ? अशी धमकी दिली व शिवीगाळ केली. त्यानंतर पवन निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्नील बागुल, सुधीर उर्फ गोट्या निमसे हे देखील तेथे आले असता उद्धव निमसे यांनी धोत्रेंना मारून टाका असे म्हटल्याने या टोळक्याने धोत्रे आणि कुसाळकर यांच्या घरावर हल्ला केला. कुसाळकर हा जीव वाचवून पळाला मात्र, त्याला टोळक्याने पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर राहुल धोत्रे याचा पाठलाग करीत संशयित आरोपींनी पकडून त्याला जवळच्या शेतात नेऊन गंभीर मारहाण केली. या मारहाणीमध्ये राहुल धोत्रे याच्या पोटातील कोथळा देखील बाहेर आला होता. पोलिसांनी त्याला व अजय कुसाळकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यातील संशयित पवन निमसे, मेघराज जोजारे, गणेश निमसे, रोशन जगताप, अक्षय पगार, सुधीर उर्फ गोटीराम निमसे आणि सुमित हंडोरे हे सात आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून उर्वरित फरार आहे.
या हल्ल्यामध्ये सहभागी असलेले अनेक संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते आणि त्यांनीच गुंड मुलांना बरोबर घेऊन स्वतः त्या दोघा युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोपी पीडित कुटुंबीयांनी केला आहे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मैदानात उतरला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत त्यांना जखमी झालेल्या व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीमध्ये उद्धव निमसे यांचे नाव स्पष्टपणे नमूद असून देखील अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाही, यावरून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप दिलेल्या निवेदनात केला आहे.
तसेच, फिर्यादीच्या कुटुंबावर सध्या राजकीय दबाव व गुंडांचा दबाव टाकण्यात येत आहे, त्यामुळे त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे. ही घटना अत्यंत गंभीर असून लोकप्रतिनिधी राहिलेल्या व्यक्तीने स्वतः हल्ल्यात सहभागी होणे हे लोकशाही व्यवस्थेवर थेट आघात आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांना आश्रय देणे आणि सामान्य जनतेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे असह्य असल्याचे नमूद करीत माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तातडीने अटक करून या हल्ल्यात सहभागी सर्व साथीदारांवरही तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजकीय दबावाला बळी न पडता ही चौकशी पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने करण्यात यावी. आडगाव व परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. ही घटना भारतीय जनता पार्टीच्या गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या वृत्तीचे आणखी एक उदाहरण असल्याने पक्षाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध देखील यावेळी करण्यात आला आहे. निवेदनातील मागण्या तात्काळ पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश गीते, आकाश धोत्रे, बाळासाहेब कोकणे, मसूद जिलानी, राहुल दराडे, संजय गोसावी, वैभव ठाकरे आदींसह पदाधिकारी आणि पीडितांचे कुटूंबीय उपस्थित होते.