तपोवन रोडवर सुटकेसमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ - CHECKMATE NEWS
क्राईम

तपोवन रोडवर सुटकेसमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ


हत्या करून मृतदेह आणून टाकल्याचा पोलिसांना संशय

नाशिक प्रतिनिधी : 

पंचवटी परिसरातील तपोवन रोडवर असलेल्या कृषी गो-शाळेसमोर असलेल्या गोदावरी नदीपात्राच्या बाजूच्या निर्जन रस्त्यावर एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेमधील मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अद्याप या महिलेची ओळख पटलेली नसून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथकाने धाव घेत पंचनामा केला असून, श्वानाने संशयितांचा माग पंचवटी कॉलेजकडून द्वारका कडे जाणाऱ्या रस्त्याकडे दाखवला आहे. 

 
अमरधाम कडून तपोवनाकडे जाणाऱ्या नदीच्या बाजूकडील रस्त्याच्या संरक्षक कठड्यांपलीकडे एका सुटकेस मधून दुर्गंधी येत असल्याचे याठिकाणी स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती कळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह असल्याचे लक्षात येताच याची माहिती वरिष्ठाना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह गुन्हे शाखा युनिट एक, आडगाव आणि भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा मृत्यू किमान तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज वर्तविला आहे. महिलेची हत्या अन्य ठिकाणी करून मृतदेह तेथेच ठेवला असावा आणि त्याची दुर्गंधी सुटल्यानंतर संशयितांनी हा मृतदेह सुटकेस मध्ये टाकून मध्यरात्री या निर्जनस्थळी आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु करण्यात आली असून, महिलेच्या हातावर असलेल्या त्रिशूल आणि ओमच्या टॅटूवरून तसेच, पोलीस ठाण्यामध्ये महिलेची मिसिंग दाखल आहे काय यावरून तिची ओळख पटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 

Translate »
error: Content is protected !!