चामर लेणी पायथ्याशी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली ! - CHECKMATE NEWS
क्राईम

चामर लेणी पायथ्याशी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली !


खून झालेल्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्यात म्हसरूळ पोलिसांना मोठे यश !
ट्रकमध्ये खून करून चामर लेणीकडे आणून टाकल्याचा पोलिसांना संशय !

नाशिक : रविवारी चामर लेणीच्या पायथ्याशी असलेल्या कच्च्या रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्यात म्हसरूळ पोलिसांना मोठे यश आले आहे. तसेच, या व्यक्तीचा ट्रक देखील पोलिसांना बेवारस स्थितीमध्ये दिंडोरी रोडवरील विज्ञान विद्यापीठाजवळच्या रस्त्यावर मिळून आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी दिली आहे. तसेच, मयताची ओळख पटल्याने लवकरच संशयितांना बेड्या ठोकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

           रविवार दि. २२ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पेठरोडवरील चामर लेणीच्या पायथ्याशी असलेल्या एका कच्च्या रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याची माहिती म्हसरूळ पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता. यावेळी मयताच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्या अंगावरील पॅन्ट देखील नसल्याचे दिसून आले. मृतदेहापासून काही अंतरावर एक ब्लॅंकेट पोलिसांना आढळून आले होते. पंचनामा दरम्यान याठिकाणी झटापट झाली असल्याच्या खुणा देखील दिसून आल्या होत्या त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयताची ओळख पटविण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी भर पावसात देखील परिसरातील पेठरोड पासून ते पेठ, गंगापूर, गिरणारे या परिसरातील आणि रस्त्यावरील सर्व हॉटेल, दिसून आलेले सीसीटीव्ही, ढाबा, दारूचे दुकान, चहा दुकान याठिकाणी चौकशी सुरु ठेवली होती. 
            याच दरम्यान म्हसरूळ पोलिसांना दिंडोरी रोडवरील म्हसरूळ बारीतील आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळ एक बेवारस ट्रक आढळून आला. मयताची ओळख आणि बेवारस ट्रक याचा समांतर तपास करत असताना बेवारस ट्रकच्या संदर्भात आणि त्यावरील चालकाच्या मित्राशी पोलिसांचा संपर्क झाला आणि त्यातून मयताची ओळख पटल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी दिली आहे. मयताचे नाव उमेश आंबिगार, ३४, मरकुंडा, ता, जि. बिदर, राज्य कर्नाटक असे असून, तो हैद्राबाद येथून ट्रक क्रमांक के. ए. ५६ ६८३० मध्ये साहित्य घेऊन दिंडोरीकडे चालला असल्याची माहिती सध्या पोलिसांच्या हाती लागली आहे. 
आम्हाला संशय आहे कि, मयत उमेश आंबिगार याचा खून ट्रकमध्ये करून त्याचा मृतदेह चामर लेणीकडे टाकला असावा. सध्या त्याची ओळख पटली असून, त्याच्या कुटुंबीयांनी देखील त्याला ओळखले आहे. त्याला मारण्याचे कारण काय, त्याला नेमके कोणी मारले, त्याच्या सोबत ट्रकमध्ये कोणकोण होते. याचा तपास सुरु आहे. लवकरच संशयित आरोपीच्या मुसक्या आवळ्यात येतील आणि खुनाचे कारण समोर येईल. : अंकुश चिंतामण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस ठाणे 

Translate »
error: Content is protected !!