पोलीस आयुक्त आपल्या दारी तरी देखील खुनाचे सत्र सुरूच !
संशयिताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !पंचवटी परिसरात खुनाचे सत्र सुरूच !
नाशिक : पेठ फाट्यावरून एरंडवाडी भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी जखमी अवस्थेत सापडलेल्या युवकाचा दारूच्या वादातून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत पंचवटी पोलिसांनी एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहे. मात्र, पंचवटी परिसरात खुनाचे सत्र सुरूच असल्याने नागरिक पोलिसांच्या भूमिकेविषयी आपला संताप व्यक्त करू लागले आहे. एकीकडे नागरिकांच्या अडचणी ऐकण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आपल्या अधिकाऱ्यांसह चौकाचौकात भेटी देत आहेत. तर दुसरीकडे गुन्हेगारी देखील दिवसेंदिवस वाढत एकप्रकारे पोलीस प्रशासनाला आव्हान देत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.
बुधवारी (दि.१२) सकाळच्या सुमारास पेठफाट्यावरील स्टेट बँकेशेजारून एरंडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता. प्रथमदर्शनी पोलिसांनी दारूच्या नशेत पडून तोंडाला मार लागला असल्याचा अंदाज आखत आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. सकाळी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच, हा युवक पडून नाहीतर त्याला मारून टाकल्याची कुजबुज परिसरात सुरु झाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त डॉ. किरणकुमार चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. यावेळी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. मयत इसमाच्या हातावर शांतीलाल ब्राहमने गों दवलेले पोलिसांना आढळून आले होते. त्याआधारे पोलिसांनी पुढील तपास सुरु केला होता. यावेळी घटनास्थळावर दारूची बाटली व ग्लास पोलीसांना आढळून आल्याने कदाचित दारू पिण्याचा वादातून किंवा मारहाणीत मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी व्यक्त केला होता. दरम्यान या घटनेचा तपास करीत असताना मयत शांतीलाल बन्सी ब्राहमने, २९, रा. बोरगड, म्हसरूळ हा त्याचा मित्र संतोष रमेश अहिरे, ३२, रा. एरंडवाडी, पेठफाटा, पंचवटी याच्या सोबत दारू पित बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित संतोष अहिरे याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दारू पिण्याच्या वादातून वाद झाल्याने शांतीलाल याच्या नाकावर मारले आणि त्यानंतर पाठीमागून डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे. खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी संशयित संतोष अहिरे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
गेल्या वर्षभरापासून पंचवटी परिसरात शांत असलेल्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे. पोलिसांचा वचक नावालाच उरला असल्याने थेट पोलीस अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहे. त्याचप्रमाणे तडीपार सराईत गुन्हेगार शहरात येऊन अवैध धंद्यांची तोडफोड करून खंडणीची मागणी करीत आहे. तरी देखील पोलीस त्याकडे डोळेझाक करीत आहे. इतकेच नव्हे तर टोळीयुद्ध सुरु होऊन त्यात थेट गोळीबार केला जात आहे. तर काही गोळीबाराच्या घटना दडपल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच, माजी महापौरांच्या जावयाची आलिशान कार चोरटयांनी लंपास केली असून, त्याचा देखील शोध घेण्यात पोलीस अद्यापपर्यंत अयशस्वी झाले आहे. त्यामुळे पंचवटीची वाटचाल बीडच्या दिशेने सुरु झाल्याचे बोलले जात आहे. कारण अनेक गुन्हे हे नागरिकांना होताना दिसत आहे. मात्र, त्याची कुठलीही नोंद पोलीस ठाण्यात होत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्याची उचलबांगडी करून नव्या दमाच्या दबंग अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी देखील केली जात आहे.
शहरात खून, प्राणघातक हल्ले, घरफोडी, जबरी लूट, दुचाकीसह चारचाकी चोरी अशा गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी पोलीस आयुक्त नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी विविध भागात फिरत आहे. मात्र, तरी देखील शहरातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याने नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच, पोलीस आणि गुन्हेगारांची अभद्र युती असल्याने शहरात राजरोसपणाने अवैध धंदे वाढू लागले आहे. तर दुसरीकडे न्यायालयाचा अवमान करून सराईत गुन्हेगारांनी शहरभर फलक लावत आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याकडे पोलीस प्रशासन सोयीस्कररीत्या कानाडोळा करीत असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची नाशिककरांना कमतरता जाणवू लागली आहे. कारण त्यांच्या कार्यकाळात एकही फलक शहरात लावण्याची हिंमत कोणीही केली नव्हती.





