धाडसी घरफोडीमध्ये ३१ तोळे सोने आणि १ किलो चांदीचे दागिने लंपास !
दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह !शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारीसह गुन्हेगारांचे साम्राज्य !
नाशिक : नाशिक मधील कायदा-सुव्यवस्था चांगलीच ढासळली आहे. पूर्वी रात्रीच्या सुमारास होणाऱ्या घरफोड्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांपेक्षा चोरांचे नेटवर्क अलर्टवर असल्याचे दिसत आहे. कारण ज्या घराला कुलूप लागले त्या घराचे कुलूप चोरट्यांकडून तोडले जात असल्याचे भयाण वास्तव समोर येत आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासन सामान्य नागरिकांसाठी आहे की, नाही असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारीसह गुन्हेगारांचे साम्राज्य वाढले असून, याकडे पोलीस प्रशासन आर्थिक हितसंबंध जोपासत डोळेझाक करीत असल्याचा आरोप नाशिककरांकडून करण्यात येत आहे.
कीर्ती त्रंबक कदम, ५१, रा. शांकुतल अपार्टमेंट, शंकरनगर, गंगापूर, नाशिक या आणि त्यांचे पती सोमवार दि. ९ रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान नोकरीनिमित्ताने बाहेर गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटामधील स्टीलच्या आणि प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलेले ३१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने तसेच, ३५ हजार रुपये रोख असा एकूण ९ लाख ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.
दिवसाढवळ्या भरवस्तीत झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे नाशिकची पोलिसिंग फेल झाल्याचे दिसत आहे. तसेच, पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क देखील नापास होऊन चोरट्यांचे नेटवर्क पास झाल्याचे बघायला मिळत आहे. कारण नाशिकमधील नागरिकांनी घराला कुलूप लावून बाहेर जाताच त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली जात आहे. पोलीस फक्त गुन्हे दाखल करून घेताना दिसत असून, गुन्ह्यांची उकल मात्र, होताना दिसत नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरात गुन्हेगारीच्या घटना घडल्यास आणि त्यावर माध्यमांनी प्रकाशझोत टाकला की, पोलीस प्रशासन काहीतरी कारवाई दाखवून पडदा टाकण्याचे आणि नागरिकांचे लक्ष वळविण्याचे काम करीत असल्याचे देखील दिसून येत आहे. मात्र, शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नाशिककर चांगलाच त्रस्त झाला असून, पोलिसांच्या सुस्त भूमिकेमुळे आपला संताप व्यक्त करीत असल्याचे दिसत आहे.
घरफोडी अथवा जबरी लूट झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करून घेतात. मात्र, यामध्ये पीडित आपल्या आयुष्यभराच्या कमाई पासून हात धुवून बसत आहे. कारण कदम यांच्या घरी झालेल्या घरफोडीचे मूल्यांकन पोलिसांनी ९ लाख रुपये लावले आहे. मात्र, आजच्या बाजारभावाचा विचार केल्यास या घरफोडीचा आकडा हा २४ ते २५ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे कदम यांनी आजपर्यंत कमावलेल्या त्यांच्या संपत्तीवर चोरटयांनी डल्ला मारल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आपली मवाळ भूमिका सोडून गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कडक पाऊले उचलण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी सुस्त पडलेल्या पोलीस ठाण्याचे आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी सक्षम अधिकारी देण्याची गरज असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात घरफोडी, जबरी लूट, वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, खून, प्राणघातक हल्ले, पोलिसांवर प्राणघातक हल्ले, भाविकांची लूट, प्रवाशांची लूट अशा प्रकारच्या गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. तसेच, अवैध दारू विक्री, मेफेड्रोन (एमडी) विक्री, गांजा, भांग असे अंमली पदार्थ विक्री आणि शहरात वाढीस लागलेले जुगार, मटक्याचे अड्डे, बॉलगेम, झटपट लॉटरी, अंदर- बाहर, पत्त्यांचे क्लब या सारखे अवैध धंदे वाढल्याने शहरात गुन्हेगारी वाढल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, याकडे संपूर्ण पोलीस यंत्रणा आर्थिक हितसंबंध जोपासत डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.





