विधानसभेच्या तिकिटासाठी ५० लाखाची मागणी !
खंडणी मागणाऱ्या दोन संशयितांना दिल्ली येथून अटक !
नाशिक : नाशिकमधील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विधानसभेचे तिकीट देतो असे सांगत ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन संशयितांना युनिट एकच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. या संशयितांना न्यायालयाने सोमवार दि. २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संशयितांनी कर्नाटक येथे झालेल्या निवडणुकीदरम्यान अशाच पद्धतीने पैसे उकळले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये या संशयितांनी सहा ते सात लोकप्रतिनिधींना फोन केल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार दि. ६ रोजी संशयित प्रमोद मिश्रा असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तीने तो पंतप्रधान कार्यालयात प्रिन्सीपल सेक्रेटरी असल्याचे सांगत एका स्थानिक आमदाराच्या मोबाईलवर फोन केला होता. यामध्ये नाशिक आणि इतर ठिकाणच्या विधानसभेचे तिकीट रदद केल्याचे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे बनावट पत्र तयार करून ते वाचुन दाखविले आणि त्यानंतर नाशिक मधील विधानसभेची जागा त्यांच्याकडे ठेवायची असल्यास उमेदवारी जाहीर होण्यापुर्वी ५० लाख रूपये दयावे लागतील असे सांगितले. तसेच, पैशांची मागणी पुर्ण न केल्यास पक्षाने तिकीट दिले तरीही त्यांची पुर्ण राज्यात बदनामी करण्याची धमकी दिली होती. याबाबत स्थानिक आमदाराने सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी संशयितांना शोधण्यासाठी हा गुन्हा गुन्हे शाखा युनिट एक कडे वर्ग केला होता. दरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी हे दिल्ली येथे असल्याचे माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीच्या आधारे उपनिरीक्षक रविंद्र बागुल, पो. हवा. प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे यांचे पथक दिल्ली येथे रवाना झाले होते. तांत्रिक माहितीच्या आधारावरून संशयित आरोपी सर्वेश मिश्रा उर्फ शिवा उर्फ दिनु सुरेंद्र मिश्रा रा. प्रताप विहार खोडा कॉलनी, गाजियाबाद, उत्तर प्रदेश आणि गौरव बहादुर सिंग नाथ रा. घडोली गाव, दिल्ली यांना ताब्यात घेतले. संशयित आरोपींविरोधात स्पेशल सेल दिल्ली येथे गुन्हा दाखल असल्याने त्यांना स्पेशल सेल दिल्ली यांनी तपासकामी ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने नाशिक पोलिसांनी त्यांचा ताबा घेत त्यांना नाशिकला आणले.
दरम्यान अटक केल्यानंतर संशयितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अशा प्रकारे नाशिक, कल्याण आणि अहिल्यानगर याठिकाणी सहा ते सात लोकप्रतिनिधींना फोन केल्याची कबुली दिली. तसेच, कर्नाटकाच्या निवडणुकीदरम्यान अशाच पद्धतीने लोकप्रतिनिधींना फोन करून खंडणी उकळल्याचे देखील त्यांनी सांगितले, कर्नाटक निवडणुकीमध्ये केलेला प्रयत्न यशस्वी झाल्याने त्यांनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे फोन करून खंडणी मागण्यास सुरु केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.





