युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला !
शहरात कोयत्यांचा सर्रास वापर ; पोलिसांविषयी नागरिकांमध्ये तीव्र रोषाचे वातावरण !
नाशिक : शहरात गोळीबाराची घटना ताजी असताना पंचवटी परिसरात रविवारी एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोच गंगापूर रोडवर सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका युवकावर काही सराईत गुन्हेगारांनी सकाळी सकाळी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासना विरोधात नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाश धनवटे हा मंगळवार दि. १ रोजी सकाळी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळून पंडित कॉलनी परिसराकडे जात असताना संशयित अथर्व दाते याने त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांसोबत येऊन आकाश धनवटे याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने आकाश गंभीर जखमी होऊन खाली पडताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती आकाशच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी आकाशाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच, संशयितांना पकडण्यासाठी त्यांच्या मागावर पथक पाठवले आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळी सकाळी झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. तर दुसरीकडे पंचवटी परिसरात रोहित अनिल माळी, २८, रा. अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगला जवळ पंचवटी नाशिक याने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार दि. २९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादी आणि त्याचे मित्र अथर्व सानप, आदित्य भामरे, प्रशांत पाटील आणि सचिन निकम हे अमृतधाम परिसरातील चिअर्स बिअर शॉपी समोर उभे असताना संशयित उमेश चांडोले, वैभव उर्फ नारायण भडांगे, विशाल उर्फ काळु भोये रा. बिडी कामगार नगर आडगाव नाशिक आणि त्यांच्या सोबत असलेल्या आठ ते नऊ संशयितांनी रिक्षा आणि दुचाकीवरून येत काहीही कारण नसताना फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करीत मारहाण करू लागले. यावेळी संशयित उमेश चांडोले याने त्याच्याकडील कोयत्याने रोहित माळी याच्या कपाळावर आणि कानावर वार केले. तसेच, तुम्हाला परत पाहून घेऊ अशी धमकी देत घटनास्थळावरून फरार झाल्याची घटना घडल्याने पंचवटी परिसरात देखील मोठी खळबळ उडाली होती.
शहर परिसरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याची चर्चा सुरु आहे. पोलिसांचा वचक नसल्यानेच भर रस्त्यात मंडप उभारून पोलिसांची कुठलीही परवानगी न घेता कार्यक्रम केले जात आहे. तर, पोलीस चौकीच्या बाहेरच डीजे वाजवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला जात असताना देखील पोलिसांकडून कुठलाही गुन्हा दाखल केला जात नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. तसेच, शहरात दुचाकी चोरीसह मोबाईल चोरी, चैन स्नॅचिंग, जबरी लूट, चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे शहर परिसरात पोलिसांविषयी संतापाचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.





