सरकारी निवासस्थानातून चंदनाच्या झाडांची चोरी ! - CHECKMATE NEWS
क्राईम

सरकारी निवासस्थानातून चंदनाच्या झाडांची चोरी !


शहरात पुन्हा चंदन तस्कर पुष्पा सक्रिय !

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा चंदन तस्कर पुष्पा सक्रिय झाला आहे. या चंदन तस्कर पुष्पाने थेट मुख्य वनरक्षक यांच्या बंगल्यालाला आपले लक्ष बनवत बंगल्याच्या आवारातील चार चंदनाची झाडे कापून चोरून नेली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, सरकारी निवासस्थाने देखील सुरक्षित राहिली नसल्याने शहरात पुन्हा गुन्हेगारांचे अस्तित्व दिसू लागले आहे. 

           याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि फिर्यादी युवराज शंकर जाधव, ४७, रा. वखंडी,पां. ढकांबे, ता. दिंडोरी हे नाशिकमधील मुख्य वनरक्षक यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या जारूल या बंगल्यामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. या निवासस्थानामध्ये अनेक चंदनाची आणि विविध प्रजातीची झाडे लावण्यात आलेली आहे. गुरुवार दि. १२ रोजी मध्यरात्री सव्वा तीन वाजेच्या सुमारास अज्ञात तिघा चंदन चोरटयांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश करून बंगल्याच्या आवारातील ४८ हजार रुपये किंमतीच्या चार चंदनाच्या झाडांचे खोड चोरून नेले आहे. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञात चार चंदन चोरांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
             सध्या नाशिकमधील वाढती गुन्हेगारी आणि चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य नागरिकांना आणि महिलांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. त्यात अनेक सराईत तडीपार गुन्हेगार पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात येऊन वास्तव्य करीत असल्याचे भयाण वास्तव पोलीस करीत असलेल्या कारवायांवरून दिसून येत आहे. या चंदन चोरीच्या घटनेमुळे आता सामान्य नाशिककरांसह सरकारी निवासस्थाने देखील सुरक्षित राहिली नसल्याचे उघड होत आहे. नाशिकमध्ये सध्या पोलिसांचा असलेला धाक नक्कीच कमी झाल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. अशी चर्चा चौकाचौकात सुरु झाली आहे. 
यापूर्वी चंदन चोरांनी थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या बंगल्यात घुसून चंदनाच्या झाडांची चोरी केली होती. तसेच, जिल्हाधिकारी यांच्या निवास्थानामध्ये देखील चंदन चोरांनी चंदनाच्या झाडांवर आपला हात साफ केल्याच्या घटना घडल्या आहे. यासह शहरातील अनेक नागरिकांच्या घराच्या परिसरातील आणि शेतामध्ये असलेली चंदनाची झाडे चंदन तस्करांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या आहे. 

Translate »
error: Content is protected !!