किरकोळ वादातून मित्रांनीच केला मित्राचा खून !
वीस दिवसात खुनाच्या दुसऱ्या घटनेने पंचवटी हादरली !
नाशिक : पंचवटी कारंजा परिसरात रात्री साडेबारा एक वाजेच्या दरम्यान एका युवकाचा दारूच्या नशेत डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून त्याच्याच मित्रांनी खून केल्याची घटना घडली आहे. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या खुनामुळे संपूर्ण पंचवटी परिसर हादरला आहे. पंचवटी कारंजा पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षममतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वीस दिवसात दुसरा खून झाल्याने पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, एकप्रकारे खुनाची मालिका सुरु झाल्याचे दिसत आहे.

मंगळवार दि. १० रोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान अतुल अशोक सूर्यवंशी, ३०, रा. श्रीधर कॉलनी, मेहरधाम, म्हसरूळ या युवकाची नरोत्तम भवन समोर असलेल्या रस्त्यावर किरकोळ वादातून त्याच्यासोबत असलेल्या प्रविण ऊर्फ बादल पवन वाघ (२३, रा. एरंडवाडी, पेठफाटा) आणि हितेश जगन्नाथ वाघ (३२, रा. फ्लॅट नं. ६, राजपाल कॉम्प्लेक्स, पेठफाटा) या मित्रांनी डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून निर्घृण खून केल्याची घटना घडली. संशयित हे एम. एच. १५ इ. क्यू. ०८९८ या दुचाकीवरून पळून जात असताना पोलीस कर्मचारी सचिन अहिरे यांनी पाठलाग करून खुनातील संशयित प्रवीण वाघ याला ताब्यात घेतले. तर दुसऱ्या संशयिताला पंचवटी पोलिसांनी पिंपळगाव बसवंत परिसरातून ताब्यात घेतले आहे.
युवकाच्या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला. तसेच, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने घेत आजूबाजूला असलेले परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहे. यावेळी पंचवटी कारंजाकडून मालेगाव स्टॅन्ड परिसराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केल्याने नागरिकांमध्ये अनेक चर्चाना ऊत आला होता. तर काहीकाळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोउपनि सचिन चव्हाण, सपोउनि संपत जाधव, पोहवा सागर कुलकर्णी, दिपक नाईक, महेश नांदुर्डीकर, संदिप मालसाणे, संतोष जाधव, कैलास शिंदे, निलेश चव्हाण, सचिन अहिरे, योगेश वाडेकर, पोना निलेश भोईर, जयवंत लोणारे, पोशि अंकुश काळे, पोशि कुणाल पचलोरे, घनशाम महाले, नितीन पवार, मपोशि रोहिणी भोईर, विष्णु जाधव, श्रीकांत कर्पे, कैलास वाकचौरे, युवराज गायकवाड तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाकडील पोलीस उपनिरीक्षक या तारडे आणि पोशि भूषण पवार यांनी केली असून, या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्योती आमणे करीत आहे.
सध्या गणेशोत्सव सुरु झाला असून, रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर भाविकांची वर्दळ दिसून येत आहे. तसेच, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. असे असताना देखील पंचवटी कारंजा पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा खून करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी पुन्हा एकदा नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पंचवटी गुन्हे शोध पथकास तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने बादल वाघ हा धुळयाला असल्याचे समजले. मात्र, संशयित प्रवासात असल्याने त्याचे ठिकाण सातत्याने बदलत असल्याने पोलीस पथक रात्रभर त्याच्या मागावर होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बादल वाघ हा वडाळी भोई ते सोग्रसफा ट्याच्या दरम्यान स्थिरावल्याचे समजताच पथकाने परिसरात सापळा लावून बादल याला ताब्यात घेतले.





