नाशिकच्या उच्चभ्रू परिसरात हुक्का पार्लर जोरात !
आर्थिक हितसंबधामुळे गंगापूर पोलिसांचा कानाडोळा !
नाशिक : आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेला उच्चभ्रू सोसायटीमधील कुंटणखाना पोलिसांनी उध्वस्त केल्याची घटना ताजी आहे. तर, दुसरीकडे कृषी नगर परिसरातील उच्चभ्रू परिसरात सुरु असलेल्या हुक्का पार्लरमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या गर्दीमुळे आजूबाजूच्या इमारतीमध्ये राहणारे रहिवाशी चांगलेच वैतागले आहे. विशेष म्हणजे या हुक्का पार्लरपासून कॉलेजरोड पोलीस चौकी अवघ्या पाचशे मीटर अंतरावर आहे. त्यामुळे हा हुक्का पार्लर कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहे. हे नव्याने सांगायची गरज नको. तसेच, आर्थिक हितसंबधांमुळे गंगापूर पोलीस या अवैध हुक्का पार्लरकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
आडगाव पोलिसांच्या वरदहस्ताने उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुरु असलेला कुंटणखाना आडगाव पोलिसांना अंधारात ठेवत मध्यवर्ती गुन्हे शाखेने उध्वस्त केल्याची घटना गुरुवारी घडली. मात्र, हा कुंटणखाना चालविणाऱ्या संशयित महिलेने येथील रहिवाशांना धमकी देत शिवीगाळ करीत मी कुंटणखाना सुरूच ठेवणार असल्याची धमकी दिली होती. शेवटी संतप्त झालेल्या रहिवाशांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत आडगाव पोलिसांना घेराव घातला होता. यावेळी याठिकाणी पुन्हा कुंटणखाना सुरु होणार नाही याची ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी दिली होती. त्यानंतर संतप्त नागरिकांनी आडगाव पोलीस ठाण्यातील ठिय्या मागे घेतला होता.
ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे उच्चभ्रू वस्ती म्हणून कॉलेज रोड, गंगापूर रोड, कृषी नगर, आनंदवली, चांदसी, कॅनडाकॉर्नर, समर्थनगर, पारिजातनगर या परिसराची ओळख आहे. या परिसरात शहरातील नामांकित डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, प्राचार्य, शिक्षक, इंजिनियर, व्यावसायिक यांच्यासह अनेक नामवंत मान्यवर या परिसरात वास्तव्यास आहे. मात्र, या परिसराला देखील अनेक अवैध धंद्यांनी विळखा घातला आहे. या अवैध धंद्यांवर यापूर्वी अनेकदा कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र, या कारवाया फक्त नागरिकांना दाखविण्यासाठी केल्या जातात असा आरोप येथील रहिवाशांकडून केला जात आहे.
त्याला कारणही तसेच आहे. कृषी नगर जॉगिंग ट्रॅक परिसरातील एका इमारतीमध्ये दिवसरात्र हुक्का पार्लर सुरु आहे. या हुक्का पार्लरमध्ये अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दिवसा महाविद्यालयाला टप्पा देऊन हुक्का मारण्यासाठी येत असतात. तर रात्री उशिरापर्यंत देखील या हुक्का पार्लरमध्ये युवक-युवतींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या हुक्का पार्लरमध्ये येणारे युवक-युवती रात्री आजूबाजूच्या पार्किंगमध्ये अश्लील चाळे देखील करीत असल्याने काही रहिवाशांनी आपली स्वतःची गैरसोय करून आपल्या पार्किंगमध्ये प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले आहे. हाकेच्या अंतरावर कॉलेज रोड पोलीस चौकी असून देखील या हुक्का पार्लरवर कुठलीही कारवाई होत नसल्याने येथील रहिवाशांनी तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न त्यांना पडला आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्तांनी या परिसरातील अनेक हुक्का पार्लर पोलिसांनी उध्वस्त केले होते. मात्र, अधिकारी बदलताच पुन्हा या हुक्का पार्लर चालकांनी पोलिसांच्या वरदहस्ताने हुक्का पार्लर थेट उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुरु केले आहे. आता या हुक्का पार्लरवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक कारवाई करणार का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.





