संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांची शांतता रॅली जल्लोषात संपन्न !
छगन भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी !
नाशिक : नाशिकमध्ये संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप होणार असल्याने नाशिककरांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यासह परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या मराठा समाज बांधवांसाठी तपोवन येथे जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक आणि भगवे झेंडे लावून शहर भगवेमय करण्यात आले होते. दुपारी दोन वाजता शांतता रॅलीला तपोवन येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज बांधवानी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली काढली होती. या रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असल्याने विद्यार्थ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. पंचवटी परिसरातील तपोवन येथून या शांतता रॅलीची सुरुवात होऊन पुढे छत्रपती संभाजी नगर नाका, आडगाव नाका, काट्या मारुती चौक, सेवाकुंज, निमाणी, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, मेहेर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या सीबीएस चौकामध्ये या रॅलीचा समारोप सभा घेऊन करण्यात आला.
दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच. शांतता रॅलीच्या सर्व मार्गावर वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले होते. तसेच. भगवे झेंडे लावून शहर भगवेमय करण्यात आले होते. तपोवन परिसरात मंगळवार दि. १३ रोजी रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या समाज बांधवांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, रॅलीच्या मार्गावर देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
जरांगे पाटील यांचे तपोवन येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास आगमन झाले त्यानंतर रॅली सुरु करण्यात आली. यावेळी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत होती. तसेच, यावेळी अनेक समाज बांधवानी छगन भुजबळ यांच्यावर आगपाखड करीत त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. रॅलीमध्ये सहामभागीं झालेल्या सर्व समाज बांधवानी डोक्यामध्ये भगव्या रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. तसेच, हातात भगवे झेंडे आणि जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ घोषणा असलेले फलक हाती घेतलेले दिसून येत होते. जरांगे पाटील यांची रॅली मालेगाव स्टॅन्ड येथे आली असता याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मालेगाव स्टॅन्ड मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नियोजित मार्गावरून रॅली सीबीएस येथे पोहोचली.





