प्रामाणिक महिला सफाई कर्मचाऱ्याची शहरात चर्चा !
सापडलेले मंगळसूत्र प्रामाणिकपणे केले पोलिसांच्या स्वाधीन !
नाशिक : शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दांपत्याच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरटयांनी दुचाकीवरून येऊन चोरी केल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेत चोरी गेलेली सोनसाखळी एका महिला सफाई कर्मचारी महिलेला सापडली आणि तिने ती प्रामाणिकपणे पंचवटी पोलीस ठाण्यात जमा केली. या प्रामाणिकतेबद्दल या महिलेचा सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार दि. २१ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास शतपावली करण्यासाठी चित्रा वडनेरे आणि महेश वडनेरे हे घराबाहेर पडले होते. दरम्यान तपोवन कॉर्नर येथील जे. के. टायर परिसरात आले असता अचानक मागून आलेल्या दोघा अज्ञात दुचाकी स्वारांनी चित्रा यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केल्याची घटना घडली होती. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, घटनेनंतर सोमवार दि. २३ रोजी मनपातील सफाई कर्मचारी अर्चना सचिन गांगुर्डे या पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी तपोवन कॉर्नर परिसरात एक तुटलेले सोन्याचे मंगळसुत्र सापडल्याची माहिती देत सापडलेले मंगळसूत्र पोलीस ठाण्यात जमा केले होते. याबाबत पंचवटी पोलिसांनी तक्रारदार चित्रा वडनेरे यांना बोलावून तुटलेले मंगळसूत्र त्यांचेच असल्याबाबत खातरजमा केली. हे मंगळसूत्र त्यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले. सापडलेल्या मंगळसूत्राची ओळख पटल्यानंतर प्रामाणिक सफाई कर्मचारी अर्चना गांगुर्डे यांचा पुष्पगुच्छ व साडी देवुन चित्रा वडनेरे यांनी सत्कार करून त्यांचे आभार मानले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (प्रशासन) सुशिल जुमडे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) ज्योती आमणे, मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, दीपक चव्हाण, राकेश साबळे हे उपस्थित होते.





