भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न !
पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी रथ मार्गात विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप !
पंचवटी : (वा.) जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर नाशिक शहरात सलग दुसऱ्या वर्षी निघालेल्या भगवान जगन्नाथ यात्रेमध्ये भाविकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविल्याने मिरवणूक मार्गावर उत्सवाचे आणि भक्तिमय वातावरण पसरले होते. श्री पंचमुखी हनुमान, श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव समिती यांच्या वतीने रविवारी काढण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. या रथयात्रेच्या मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रथाचे भव्य असे स्वागत करण्यात येत होते. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी रथ मार्गावरील उपस्थित भाविकांना विविध भारतीय प्रजातींच्या वृक्षांची रोपे मोठ्या प्रमाणात वाटण्यात आली.

पंचवटीतील जुना आडगाव नाका येथील पंचमुखी हनुमान मंदिरात भगवान जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या वर्षांपासून भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्याची संकल्पना महंत भक्तीचरणदास महाराज यांनी मांडली होती. यासाठी सकल हिंदू समाज, पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट, रामरथोत्सव समितीने या रथोत्सवासाठी पुढाकार घेतला होता. या रथयात्रेसाठी नव्याने एका रथाची निर्मिती करून त्याचे मोठ्या जल्लोषात अनावरण करण्यात आले होते.
रविवार दि. ७ रोजी सकाळी ७ वाजता तपोवन येथून भगवान श्री जगन्नाथ भगवान यांचा सजविलेला रथ पंचमुखी मंदिरात वाजत गाजत आणण्यात आला. त्यानंतर सकाळी आठ वाजता भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीची यथोचित पूजाअर्चा करून आरती करण्यात येऊन शृंगार व भोग नैवद्य अर्पण करण्यात आल्यानंतर सकाळी १० वाजता भगवान जगन्नाथांच्या मूर्तीसह बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींना रथात स्थानापन्न करण्यात आले. यावेळी भगवान जगन्नाथांचा एकच जयजयकार करण्यात आला. त्यानंतर विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त डॉ. कैलास करंजकर यांच्या हस्ते श्रींची पूजा आरती करण्यात येऊन रथापुढे झाडू मारण्यात आला. त्यानंतर रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी रथाच्या पुढे ढोलताशे यांच्यासह महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथोत्सवास प्रारंभ होऊन रथ पुढे जुना आडगाव नाका, गणेशवाडी, गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, मेनरोड, रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, शिवाजी चौक, सीतागुंफा, काळाराम मंदिर, नाग चौक येथून पंचमुखी हनुमान मंदिर येथे रथोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
रथोत्सवाप्रसंगी विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त डॉ. कैलास करंजकर, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी महापौर दशरथ पाटील, महंत भक्तीचरणदास महाराज, भक्ती धाम येथील महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती, गोरेराम मंदिराचे महंत राजारामदास महाराज, महंत सदानंद महाराज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, कपालेश्वर संस्थान अध्यक्ष अक्षय कलंत्री, श्रद्धा दुसाने, किरण सोनवणे, गोविंद वैष्णव, हर्षद बेळे, नंदू कहार, भगवान पाठक, रामसिंग बावरी, राहुल बर्वे, सचिन डोंगरे, सचिन लाटे आदींसह साधू-महंत, भाविक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रथयात्रेत सहभागी झाले होते.
भगवान जगन्नाथ रथयात्रेमध्ये अखिल भारतीय श्री वैष्णव दिगंबर अनि आखाडा, अखिल भारतीय श्री निर्वाणी अनि आखाडा, अखिल भारतीय श्री निर्मोही अनि आखाडा यांचे निशाण घेऊन साधू-महंत दाखल झाले होते. तसेच, भाविकांनी श्रीगणेश, ब्रम्हा, विष्णू, महेश, हनुमान यांच्यासह विविध देवी देवतांच्या वेशभूषा करून सहभागी झाले होते. इस्कॉनच्या साधकांनी या रथयात्रेत सहभागी होत ताल नृत्याने सर्वाना मंत्रमुग्ध केले होते. त्यांना बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविक आणि नाशिककरांनी गर्दी केली होती.
रथयात्रा मार्गावरील काट्या मारुती चौक, कृष्णनगर, गणेशवाडी, संत गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, व्यापारी मित्र मंडळ, धुमाळ पॉईंट, मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, पाथरवट लेन, काळाराम मंदिर, नागचौक याठिकाणी रथयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी रथयात्रेत सहभागी झालेल्या साधू-महंतांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
रथाच्या सर्वात पुढे हनुमान ध्वज (निशाण) घेऊन साधू सहभागी झाले होते. त्यानंतर जगन्नाथ पुरीचे घडियाल, घंटा आणि मृदूंग हे वाद्य वाजविणारे वादक ओडिसा येथून आले होते. त्यामागे कैलास मठातील बटु वेदघोष करीत होते. नाम संकीर्तन गोपीनाथ गौडीय संप्रदाय, इस्कॉन संस्थेच्या भक्तांनी केले. तर डमरू वाद्य आणि १०० शंख वादकांद्वारे वाजविण्यात येत असल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. तसेच, मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.





