लाच घेतांना दोन वैद्यकीय अधिकारी गजाआड !
फिट फॉर सर्टिफिकेटसाठी लाच स्वीकारताना कारागृहातील डॉक्टर जाळ्यात !=
नाशिक : कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला फिट फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहहातील दोन वैद्यकीय अधिकारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात अडकले आहे. या घटनेमुळे मध्यवर्ती कारागृहाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
डॉ. आबिद आबू अत्तार, वर्ग-१, मुख्य वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड आणि डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार, वर्ग-२, वैद्यकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, यातील तक्रारदार यांचे मित्र हे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून, शासकीय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचे वय ६५ वर्षा पेक्षा जास्त आहे. तसेच ज्या कैदीने १४ वर्षे शिक्षा भोगलेली आहे अशा कैदी यांना शासनाने नेमून दिलेली समिती मुक्त करते. परंतु अशा कैद्यांना बाहेर सोडण्याकरीता मुख्य वैद्यकिय अधिकारी यांचे फिटफॉर सर्टिफिकेटची गरज असते. म्हणून संशयित आलोसे डॉ. आबिद आबू अत्तार आणि डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार यांनी तक्रारदार यांचे मित्र यांना फिटफॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला ४० हजार रुपयांची मागणी करून पंचासमक्ष तडजोड अंती ३० हजार रुपयाची मागणी केली होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली असता रविवार दि. १४ रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात सापळा लावण्यात आला होता. यावेळी संशयितांनी ३० हजार रुपये स्वीकारले असता त्यांना पथकाने अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून, कारागृहाचा कारभाराचे वाभाडे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.





