पहिल्याच श्रावणी सोमवारी भोलेभक्तांचा उत्साह शिगेला ! - CHECKMATE NEWS
धार्मिक

पहिल्याच श्रावणी सोमवारी भोलेभक्तांचा उत्साह शिगेला !


बम बम भोलेच्या गजरात दुमदुमला गोदाघाट !
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गोदाकाठी मांदियाळी !
नाशिक :  पंचवटी परिसरातील गंगाघाटावर असलेल्या कपालेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बम बम भोलेच्या गजरात संपूर्ण गंगाघाट परिसर दुमदुमला होता. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दूध आणि बेलाच्या पानाने दिवसभर भोलेचा अभिषेक सुरु होता. तसेच पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने रामकुंडात स्नानासाठी भाविकांची मांदियाळी दिसून आली. 
              गोदावरी नदीवरील रामकुंडासमोर असलेल्या टेकडीवर भगवान कपालेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून तसेच इतर जिल्ह्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी कपालेश्वर संस्थानच्या वतीने याठिकाणी दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. नंदी नसलेले जगातील एकमेव महादेवाचे मंदिर असल्याने कपालेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कपालेश्वर महादेवाला सोमवार दि. ५ रोजी पहाटे साडे तीन वाजता अभ्यंग स्नान घालून चार वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर दुग्धाभिषेक करण्यात येऊन शिवमूठ वाहण्यात आली. दुपारी एक वाजता कपालेश्वर महादेवाला स्नान घालून शृंगार करण्यात आला. त्यानंतर महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या दुधाचे संकलन करून ते शिवभक्तांना प्रसाद स्वरूपात वाटण्यात आले. दुपारी चार वाजता कपालेश्वर महादेवाची परंपरांगत मार्गावरून पालखी काढण्यात आली. पालखी रामकुंडावर आल्यावर रामकुंडात महादेवाच्या मुखवट्याला स्नान घालण्यात आले. त्यानंतर रात्री १० वाजता महाआरती करण्यात आली. 
           पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. कपालेश्वर संस्थानच्या वतीने महिला आणि पुरुषाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या. कपालेश्वर महादेवाचे श्रावण महिन्यातील दर्शनास फार मोठे महत्व असल्याने दिवसभरात जवळपास लाखो शिवभक्तांनी येथे येऊन दर्शन घेतले. अनेक भाविकांनी महादेवाच्या पिंडीवर दुधाचा आणि बेलाच्या पानाचा अभिषेक केला. तर हजारो भाविकांनी रामकुंडात पवित्र स्नान करण्यासाठी देखील मोठी गर्दी केली होती. 
           दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड पोलीस अधिकारी, महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच, रामकुंड आणि गंगाघाटाकडे येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवून गर्दीचे नियोजन करण्यात आले होते. 
कपालेश्वर महादेव मंदिराशिवाय गंगाघाट आणि पंचवटी परिसरात असणाऱ्या निळकंठेश्वर, नारोशंकर, गोरा नंदी मंदिर, स्वयंभू बाणेश्वर, अर्ध नारी नटेश्वर, टाळकुटेश्वर, कैलास मठ, जनार्दन स्वामी मठ आदी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसत होते. तसेच अनेक धार्मिक संस्थांकडून रामकुंड परिसरात शिवभक्तांना फराळाचे वाटप केले जात होते.
श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येत असल्याने शेकडो हातांना रोजगार उपलब्ध होतो. शहराच्या आजूबाजूच्या गाव खेड्यांमधून बेल-फुल घेऊन विक्रेते मोठ्या संख्येने आलेले दिसत होते. त्याचप्रमाणे अनेक लहान मुले भाविकांच्या कपाळावर गंध लावून पैसे मिळवून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच, अनेक फळ विक्रेते, दीप विक्रेते आणि खेळणी विक्रेत्यांनी देखील परिसरात गर्दी केली होती. 
श्री कपालेश्वर महादेव मंदिर (ट्रस्ट) तर्फे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भक्तांच्या सोयीसाठी रामकुंड समोरील पायऱ्यांनी भक्तांना प्रवेश दिला जात होता. यामध्ये मारुती मंदिराकडून महिला तर गणपती मंदिराकडून पुरुष अशी स्वतंत्र दर्शन रांग करण्यात आली होती. शौनकाश्रम व गोरेराम मंदिर या बाजूने मंदिरामध्ये येण्यास प्रवेश बंद करण्यात आला होता. यामध्ये मुख्य, उत्तर, दक्षिण प्रवेशद्वार व दर्शन दांडीजवळ अशा ४ ठिकाणी पुरुष आणि महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच, भक्तांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अद्ययावत यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून, महत्त्वाच्या सूचना व माहिती देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले आहे.

Translate »
error: Content is protected !!