आडगाव पोलीस ठाणे नव्हे अवैध धंदे परिसर ?
हॉटेल, ढाबे यामध्ये सर्रास बेकायदेशीर दारू विक्री !पोलीस वसुलीत दंग तर रहिवाशी गुन्हेगारीने त्रस्त !
नाशिक : शांत आणि नव्याने विकसित होणारा परिसर अशी ओळख आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसराची होती. मात्र, सध्या या परिसराला अवैध धंदे आणि गुन्हेगारीने विळखा घातला आहे. टप्प्याटप्प्यावर अवैध धंदे तसेच, गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे. घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटना या नित्याच्याच बनल्या आहे. तर याच परिसरात गांजा आणि एमडी सारखे अंमली पदार्थ देखील खुलेआम पद्धतीने मिळू लागले आहे. त्यामुळे आडगाव परिसर गुन्हेगारीचा अड्डा बनू पाहत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याची वाढती हद्द लक्षात घेता पंचवटी पोलीस ठाण्याचे विभाजन करून आडगाव पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. भाडे तत्त्वावर असलेल्या इमारतीमध्ये सुरु झालेल्या आडगाव पोलीस ठाण्याचा कारभार जुलै २०१७ मध्ये सुसज्ज अशा पोलीस प्रशासनाच्या मालकीच्या जागेत सुरु झाले होते. मात्र, नव्या जागेत स्थलांतर झाल्यानंतर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक नवीन वसाहती आणि लोकवस्ती वाढू लागली. यासह य पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मुंबई आग्रा महामार्ग, संभाजीनगर महामार्ग जात असल्याने या महामार्गावर अनेक ढाबे आणि हॉटेल सुरु झाले. आणि कालांतराने या ढाबे आणि हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारू विक्री होऊ लागली. कुठलाही टॅक्स न भरता जणूकाही बारच एकप्रकारे सुरु झाले. याठिकाणी परमिट रूम पेक्षा स्वस्तात मद्यपींच्या पार्ट्या होऊ लागल्याने मद्यपींचा राबता या परिसरात वाढू लागला आणि या शांत परिसरात अशांतता पसरू लागली. मद्य रिचविण्यासाठी गुन्हेगारांचा राबता या बेकायदेशीर ढाबे आणि हॉटेलमध्ये वाढू लागल्याने परिसरातील नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बेकायदेशीर दारू विक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेला आडगाव शिवारा चा परिसरात हळूहळू अंमली पदार्थांचा अड्डा बनला गेला. अनेक ठिकाणी गांजा, एमडी. ड्रग्स मिळू लागले. पोलिसांनी केलेल्या कारवाईमधून हे लपून राहिलेले सत्य नाशिककरांसमोर येऊ लागले. इतकेच नव्हे तर मटका, जुगार, रोलेट, गुटखा, घरगुती गॅसचा काळाबाजार असे एकनाअनेक अवैध धंदे राजरोसपणाने आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या आशिर्वादामुळे बिनदिक्कत सुरु झाले आहे. या अवैध धंदे चालकांकडून वसुलीसाठी आडगाव पोलीस ठाण्यात एक दोन नव्हे तर सुभेदारांची टोळी कार्यरत झाली होती. पोलिसांचा कल वसुलीकडे वाढल्याने या परिसरात खून, प्राणघातक हल्ले, घरफोड्या, दुचाकी चोरी, ट्रकमधून डिझेल चोरी, चैन स्नॅचिंगच्या घटना वाढू लागल्या आहेत. मात्र, आडगाव पोलिसांना याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या सर्व्हिस रोडवर एक वाईन शॉप आहे. या वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी रात्रीच्या सुमारास मद्यपी मोठी गर्दी करतात. हा दुकानात आलेले मद्यपी रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावत असल्याने याठिकाणी दररोज वाहतूक विस्कळीत होत असते. सामान्य नागरिक हटण्यास गेल्या मद्यपी थेट अरेरावीवर उतरत असतात त्यामुळे या ठिकाणी अनेकदा वाद होताना दिसत असते. मात्र, याठिकाणाहून देखील वसुली केली जात असल्याने पोलीस याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी करीत आहे.
शांत आणि शहराच्या गलबटापासून दूर असलेल्या आडगाव सारख्या परिसराला देखील पोलिसांच्या आशिर्वादामुळे अवैध धंद्याचा विळखा पडू लागला आहे. आडगाव गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच एक मोठा मटक्याचा अड्डा सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी विदयार्थी येत असतात. त्यांच्यावर देखील अवैध धंद्यांचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. तर याच परिसरात गांजा आणि एमडी सारखे अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे जाळे वाढू लागले आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.