माजी नगरसेवकाकडून दोघा युवकांवर प्राणघातक हल्ला ! - CHECKMATE NEWS
क्राईम

माजी नगरसेवकाकडून दोघा युवकांवर प्राणघातक हल्ला !


टोळक्याच्या हल्ल्यात एका युवकाचा कोथळा बाहेर ! 
राजकीय वादातून हल्ला केल्याचा पीडितांचा आरोप !
नाशिक : नांदूर नाका परिसरात किरकोळ वादातून दोघा युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी घरात घुसून महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. या घटनेत एका युवकाची प्रकृती गंभीर असून, दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा हल्ल्या माजी नगरसेवकाने घडवला असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे राजकीय किनार असून, विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराचे काम केल्याच्या रागातून हल्ला केल्याची परिसरात चर्चा रंगली आहे. 
             याबाबत पोलिसांनी आणि पीडितांच्या कुटुंबियांनी दिलेली माहिती अशी की, राहुल राजू धोत्रे, २५, रा. जनार्दन नगर, नांदूर नाका आणि अजय दत्तू कुसाळकर, २७, रा. जनार्दन नगर, नांदूर नाका यांच्यासोबत निमसे यांच्या दोन मुलांचा शुक्रवार दि. २२ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नांदूर नाका परिसरात गाडीचा कट लागल्यावरून वाद झाले होते. मात्र, हे वाद तात्पुरते मिटविल्यानंतर निमसे आणि त्यांच्या साथीदारांनी धोत्रे आणि कुसाळकर यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी कुसाळकर हा जीव वाचवून बाहेर पळाला तर धोत्रे हा निमसे यांच्यासह आलेल्या टोळक्याच्या तावडीत सापडल्याने त्याला उचलून एका शेतात नेवून गंभीर मारहाण केली. यावेळी या घटनेची माहिती आडगाव पोलिसांनी मिळाली. माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धोत्रे याचा शोध घेतला असता राहुल धोत्रे हा रक्तभंबाळ आणि पोटातील कोथळा बाहेर पडलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहीका बोलावून घेत राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच धोत्रे आणि कुसाळकर यांच्या परिवारातील सदस्यांनी आणि मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतल्याने काहीकाळ वातावरण तापले होते. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 
सायंकाळी झालेल्या भांडणानंतर दोन्ही गटाचे लोक भांडण मिटविण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी उद्धव निमसे यांच्यासोबत आलेल्या टोळक्याने थेट धोत्रे आणि कुसाळकर यांच्या घरावर हल्ला केला. यामध्ये कुसाळकर याला बेदम मारहाण करण्यात आली तर धोत्रे याला मारहाण करीत उचलून नेत एका शेतामध्ये पुन्हा मारहाण करत त्याच्या पोटातील आतड्यांचा कोथळा बाहेर काढण्यात आला होता. शेवटी घटनास्थळावर पोलीस पोहचल्यानंतर धोत्रे याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निखिल बोन्डे करीत आहे. 
 
ज्या परिसरात हल्ला करण्यात आला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे त्यांच्या शंभर सव्वाशे कार्यकर्त्यांसह हल्ला करण्याच्या दृष्टीने रहिवाशी परिसरात घुसत असल्याचे दिसत आहे. तसेच, मारहाण केल्यानंतर जखमी कुसाळकर याला पुन्हा बाहेर घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहे. तर राहुल धोत्रे याच्या पोटात सुमित हांडोरे याने चॉपर आणि त्याच्या साथीदारांनी डोक्यात लोखंडी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे.  
 
 

Translate »
error: Content is protected !!