उबाठाच्या नेत्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

उबाठाच्या नेत्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल !


उपनेते सुनील बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल ! 
सोशल मीडियावर बदनामी केली म्हणून केला प्राणघातक हल्ला !
नाशिक : सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर बदनामी करत ईडीची चौकशी करण्याची मागणी केली म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी थेट घरात घुसून प्राणघातक हल्ला करत लूटमार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सात संशयितांविरोधात दरोडा, बेकायदेशीर जमाव, प्राणघातक शस्त्रे घेऊन दंगल, पूर्व नियोजन करून घरात घुसून मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. राजकीय नेत्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 
            याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि किशोर उर्फ, गजू गोपालराव घोडके, ४९, रा. घोडेबाबा नगर, काठे गल्ली, नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घोडके यांनी उबाठा गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्या विरोधात दि. २७ जून रोजी पैशांचा गैरव्यवहार करून करोडो रुपयांची संपत्ती जमावली असून त्यांच्यावर ईडीने कारवाई करावी हा व्हिडीओ बनवून त्याचे प्रसारण सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंटवर केले होते. त्यानंतर बागुल यांचा कार्यकर्ता बाळा पाठक याने मला व्हिडीओ डिलीट करण्यासाठी विनंती केली होती. तसेच, उबाठा गटाचे महानगर प्रमुख मामा राजवाडे आणि सागर देशमुख यांनी फोन करून व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले होते. मात्र, घोडके यांनी व्हिडीओ डिलीट करण्यास नकार दिला होता. 
           त्यानंतर दि. २९ जून रोजी बागुल यांनी काही संशयितांना रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आपल्याला मारहाण करण्यासाठी पाठवले होते. मात्र, घोडके यांनी दरवाजा उघडला नसल्याने संशयित तेथून निघून गेले होते. त्यानंतर दि. ३० जून रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास अचानक मामा राजवाडे, सागर देशमुख, अमोल पाटील, लखन दोंदे, लखन झुरड्या, विलास सनसे यांच्यासह इतर पंधरा ते वीस संशयितांनी लोखंडी कोयते, लोखंडी पाईप आणि विटा घेऊन बेकायदेशीररीत्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर सर्व संशयितांनी मिळून प्राणघातक हल्ला केला आणि गंभीर जखमी केले. यावेळी मामा राजवाडे याने सुनील बागुल विरोधात टाकलेला व्हिडीओ तात्काळ काढून टाक नाहीतर तुला मी मारून टाकेल अशी धमकी दिली आणि सुनील बागुल जिंदाबाद अशा घोषणा देत संशयित निघून गेले असल्याबाबत फिर्यादीमध्ये म्हटले आहे. 
             तसेच, घोडके यांना मारहाण करताना त्यांच्या गळ्यातील दोन लाख रुपये किंमतीची पंचवीस ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, घरातील एक लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली असून, घराचा दरवाजा, कंपाउंड, टीव्ही, टी. पॉयसह इतर वस्तूंची तोडफोड करीत जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान केल्याचे आणि जोवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. याबाबत घोडके यांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत घोडके यांना उपचारासाठी खासगी रुग्नालयात दाखल केले आहे. घोडके यांनी गुन्हा दाखल करताच पोलिसांनी लखन दोंदे आणि लखन झुरड्या यांना अटक केली असून, इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एम. आर. कारंडे करीत आहे. 

Translate »
error: Content is protected !!