बाजार समिती सभापती पदी श्री. कि सौ. चुंभळे ?
बाजार समितीला मिळणार पहिल्या महिला सभापती ?
कल्पना चुंभळे यांच्या नावाला संचालकांची सहमती !
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक बुधवारी होत आहे. यासाठी चुंभळे गटाने आपली सर्व तयारी पूर्ण केली असून, आपल्या गटाच्या संचालकांना घेऊन चुंभळे अज्ञातस्थळी गेले होते. हे सर्व संचालक मंगळवारी नाशिकमध्ये दाखल झाले आहे. सभापती पदासाठी चुंभळे गटाकडून शिवाजी चुंभळे यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी कल्पना चुंभळे यांना सभापती केले जाणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला ७३ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला सभापती मिळणार आहे. त्यामुळे सभापती शिवाजी चुंभळे कि कल्पना चुंभळे होणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देविदास पिंगळे यांच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराला वैतागलेल्या पिंगळे गटाच्या नऊ संचालकांनी त्यांची साथ सोडत शिवाजी चुंभळे यांना पाठिंबा दिला होता. यामुळे बाजार समितीमध्ये सत्तांतराचे वारे वाहू लागले. चुंभळे गटाच्या एकूण १५ संचालकांनी एकत्र येत सोमवार दि. ३ रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी मंगळवार दि. ११ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये माजी सभापती शिवाजी पांडुरंग चुंभळे, संपतराव महादू सकाळे, विनायक शंकर माळेकर, युवराज बाबुराव कोठुळे, सविता संजय तुंगार, जगन्नाथ हरिभाऊ कटाळे, भास्कर गोपाळ गावित, संदीप शिवाजी पाटील, चंद्रकांत दशरथ निकम, जगदीश अशोक अपसुंदे, राजाराम धोंडीराम धनवटे, तान्हाजी पांडुरंग करंजकर, कल्पना शिवाजी चुंभळे, धनाजी पुंजाजी पाटील, प्रल्हाद त्रंबक काकड या पंधरा संचालकांनी मतदान केले. तर देविदास पिंगळे, उत्तमराव खांडबहाले, निर्मला कड हे संचालक या सभेला अनुपस्थित राहिल्याने अविश्वास ठराव पंधरा विरुद्ध शून्य असा मंजूर करण्यात आला होता.
अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर नव्या सभापती पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवार दि. १९ रोजीची तारीख दिली होती. त्यामुळे चुंभळे गटाचे संचालक पुन्हा एकदा अज्ञातस्थळी रवाना झाले होते. सभापती पदाच्या निवडीसाठी अज्ञातस्थळी गेलेले सर्व संचालक मंगळवार दि. १८ रोजी संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले आहे. हे सर्व संचालक बुधवार दि. १९ रोजी सकाळी अकरा वाजता मतदान करण्यासाठी एकत्र बाजार समितीमध्ये दाखल होणार आहे. सभापती पदाची निवडणूक प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य मार्केट कमिटीच्या कार्यालयामध्ये होणार आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना २१ नोव्हेंबर १९५२ रोजी झाली आहे. या काळामध्ये २७ संचालकांनी बाजार समितीची धुरा वाहिली आहे. यामध्ये जानेवारी १९८४ ते जानेवारी १९८९ पर्यंत दोन प्रशासक नेमण्यात आले होते. तसेच, जानेवारी १९८९ ते फेब्रुवारी १९९२ मध्ये कै. पोपटराव पिंगळे यांनी शासन नियुक्त सभापती म्हणून काम बघितले होते. तर तर चार संचालकांनी प्रभारी म्हणून कारभार बघितला आहे. तसेच, यंदाच्या निवडणुकीपूर्वी देखील २०२२-२३ दरम्यान प्रशासक बसविण्यात आले होते. या दरम्यानच्या ७३ वर्षांमध्ये एकदाही महिला संचालकांकडे सभापती पदाची धुरा देण्यात आलेली नाही. मात्र, यंदा चुंभळे गट कल्पना चुंभळेंच्या नावावर आग्रही असल्याचे समजते. तसेच, चुंभळे परिवाराकडून देखील या नावाला पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी अचानक सभापती पदासाठी कल्पना चुंभळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन त्यांच्या डोक्यावर सभापती पदाचा मुकुट चढविण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे बुधवारी सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये काय काय घडामोडी घडणार याकडे सर्व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.





