महिला भाविकांची पर्स चोरणाऱ्या चोरट्या महिलेला पकडणार का ?
गोदा घाटावर भाविकांची लूट करणाऱ्या संशयिताला बेड्या !स्नानासाठी नदीपात्रात उतरलेल्या भाविकांच्या साहित्य चोरीप्रकरणी कारवाई !
नाशिक : रामकुंडावर स्नानासाठी आलेल्या महिलांची पर्स पळविल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा मौनी अमावस्या निमित्त भाविक रामकुंडात स्नानासाठी उतरले असता त्यांच्या कपड्यांसह त्यांचे मोबाईल आणि पैसे चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत शहर पोलिसांवर भाविकांनी ताशेरे ओढल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या युनिट एकच्या पथकाने एका संशयिताला सीबीएस परिसरातून ताब्यात घेत त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र, महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढणाऱ्या संशयित महिलेला पंचवटी पोलीस पकडणार का अशी चर्चा गोदाघाट परिसरात रंगली आहे.
गोदाघाट परिसरातील, रहिवाशी, व्यावसायिक परिसरातील वाढती गुन्हेगारी, वाहतूक समस्या, गोदावरी प्रदूषण, वाढते अतिक्रमण, भाविकांची लूटमार, रिक्षा चालकांची मनमानी यामुळे त्रस्त झाले आहे. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे देखील तक्रारी केल्या होत्या. मात्र, तक्रार केल्यांनतर काही तासातच बाहेर गावावरून रामकुंड येथे दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या हातामधील २५ ते ३० हजार रुपये रोख असलेली पर्स एका चोरट्या महिलेने पळविल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेला काही तास उलटत नाही तोच बुधवार दि. २९ रोजी सकाळी साडेनऊ वाजता मौनी अमावस्या निमित्त नाशिकच्या रामकुंडामध्ये स्नानासाठी दिवाकर शांताराम मोरे, ५९, रा. आनंदनगर, देवपूर, धुळे हे आपल्या मित्रासोबत आले होते. मोरे आणि त्यांच्या मित्राने आपले कपडे आणि आपले साहित्य काढून ठेवत दुतोंड्या मारोती याठिकाणी नदीपात्रात स्नान करण्यासाठी उतरले होते. स्नान करून बाहेर आल्यावर त्यांना आपले कपडे, आय फोन, महागडा गॉगल, चार हजार रुपये रोख आणि चारचाकी वाहनांची चावी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे आढळून आले होते. याबाबत मोरे यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
मात्र, या चोरीच्या घटनांमुळे नाशिक शहर पोलीस प्रशासनावर भाविकांनी ताशेरे ओढत आपलं संताप व्यक्त केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून झोपेचे सोंग घेतलेले पोलीस प्रशासन चांगलेच खडबडून जागे झाले. या चोराचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार विशाल काठे यांना चोरीच्या गुन्ह्यातील संशयित हा सीबीएस परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सीबीएस येथे सापळा रचून संशयित शरद शंकर जाधव, ३१, रा. दत्त चौक, मटन मार्केटजवळ, नाशिक याला ताब्यात घेतले. यावेळी संशयित जाधव याने चोरी केल्याची कबुली देत चोरीच्या गुन्ह्यातील तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
रामकुंडावर शुक्रवार दि. २४ रोजी सकाळी बाहेर गावावरून रामकुंड येथे दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या हातामधील २५ ते तीस हजार रुपये असलेली पर्स एका चोरट्या महिलेने हिसकावत फरार झाली आहे. मात्र, या भाविकांना पुढच्या प्रवासाला जायचे असल्याने आणि वेळ नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास वेळ जाईल म्हणून नाशिकच्या गुन्हेगारीला शिव्या शापाची लाखोली वाहत गोदाघाटावरून काढता पाय घेतला होता. याबाबत पोलिसांनी पुढे येऊन स्वतः अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र, तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गोदाघाट परिसरात चोरी करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. मात्र, या संशयित महिलेला पोलीस पकडणार का असा प्रश्न या घटनेचे साक्षीदार असलेले नागरिक आणि स्थानिक व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.





