तडीपार गुन्हेगाराचा अवैध धंद्यावर धुडगूस ! - CHECKMATE NEWS
क्राईम

तडीपार गुन्हेगाराचा अवैध धंद्यावर धुडगूस !


२० हजार हप्ता न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची चर्चा !
पोलिसांच्या अस्तित्वावरच नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित !

नाशिक : पंचवटी परिसरातील एका अवैध धंद्यावर तडीपार गुंडाने धुडघूस घालत हप्ताची मागणी केली आहे. तसेच, हप्ता न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. विशेष म्हणजे असे काही घडणार असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आणि गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्याला देण्यात आल्याची याठिकाणी चर्चा सुरु होती. त्यामुळे गुन्हेगाराने एकप्रकारे पोलिसांनाच खुले आव्हान दिल्याचे दिसत आहे. अवैध धंद्यावर धुडगूस घातला गेल्याने गुन्हा कसा दाखल करावा असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांना पडला आहे. तर दुसरीकडे धिंगाणा बघणाऱ्या नागरिकांना शहरात पोलीस आहे कि नाही असा प्रश्न पडला आहे. अशा पोलिसिंगवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

         पंचवटी परिसरातील अवैध धंदे आणि या अवैध धंद्यातून मिळणारी माया गोळा करण्यासाठी पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अक्षरशः देव पाण्यात ठेवून बसलेले असतात. पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी वर्णी लावण्यासाठी अनेक राजकीय व्यक्तींना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड केली जात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगलेली आहे. या अवैध धंदे मालकांकडून वसुलीसाठी शहर पोलीस दलात अनेक सुभेदार कार्यरत आहे. हे सुभेदार देखील आपले वजन वापरून आपल्या मर्जीतील पोलीस ठाणे मिळविण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. पंचवटी परिसर अवैध धंद्यासाठी कुप्रसिद्ध आहे. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांना नागरिकांमध्ये या अवैध धंद्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मालिन होत आहे. याच्याशी कुठलेही देणेघेणे नसते. फक्त हप्तावसुली करून आपले उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानताना दिसतात. यामुळे मात्र, परिसरातील थांबलेली गुन्हेगारी पुन्हा एकदा उफाळू लागली आहे. पोलीस मॅनेज होत असल्याने गुन्हेगारांना कुठलीही भीती उरली नसल्याने थेट पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याची मजल गुन्हेगारांची गेली आहे.  
         सध्या पुन्हा एकदा पंचवटी गुन्हेगारीचे माहेर घर बनू लागले आहे. पोलीस अधिकारी सुस्त झाल्याने आणि अवैध धंदे वाढल्याने परिसरात खून, प्राणघातक हल्ले, जबरी लूट, घरफोडी, भाविकांची लूट, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, गोळीबार अशा घटना वाढू लागल्या आहे. त्यातच सोमवार दि. २७ रोजी दुपारच्या सुमारास दिंडोरी नाका परिसरातील एका मटक्याच्या अड्ड्यावर एका तडीपार गुंडाने येऊन हप्त्यासाठी धुडगूस घातला. या ठिकाणी मटका खेळण्यासाठी आलेल्या खेळींना मारहाण करीत त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले. तसेच याठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोन्याचे ओम पान बळजबरीने काढून घेतले. तसेच, महिन्याला वीस हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाहीतर गोळ्या घालण्याची धमकी देत हा तडीपार गुन्हेगार उजळ माथ्याने परिसरातून निघून गेला. मात्र, पोलिसांकडे गेल्यास गोळ्या घालण्याची धमकी देत असल्याने या अवैध धंदे चालकापुढे काय करावे असा प्रश्न पडला आहे. 
हा तडीपार गुन्हेगार अवैध धंद्यावर येऊन धुडगूस घालणार आहे. याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र, यातील कोणीही या गंभीर विषयाकडे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे पोलिसांच्या नाकावर टिच्चून तडीपार गुंडाने शहरात येऊन धिंगाणा घालून गेल्याने या विषयाची परिसरात जोरदार चर्चा सुरु होती. यामुळे पोलिसांच्या अस्तित्वावरच नागरिकांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुन्हा दाखल करावा तर पंचवटी परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरु असल्यावर शिक्कामोर्तब होणार आणि नाही केल्यास अवैध धंदे चालकांना संरक्षण न देता त्यांच्याकडून हप्ते कसे घ्यावे किंवा ते देतील का असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे सध्या पंचवटी पोलिसांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत आहे. 

Translate »
error: Content is protected !!