पूर्व मतदार संघात ॲड. राहुल ढिकले यांचा दणदणीत विजय !
८९ हजार ११० मतांनी ढिकले यांचा विजय !चौकाचौकात ढिकले यांचे जल्लोषात स्वागत !
नाशिक : नाशिक पूर्व मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांचा दणदणीत विजय झाला आहे. १ लाख ५६ हजार २४६ मते घेत ढिकले यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या या विजयाचे पूर्व विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात एकच जल्लोष करण्यात आला. तर दुसरीकडे गीते समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. दुपारनंतर गीते समर्थकांनी मतमोजणीच्या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. या निवडणुकीमध्ये गणेश गीते यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यावेळी ढिकले यांनी जनशक्तीचा विजय झाला असून, धनशक्तीचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया दिली.
पूर्व मतदारसंघाचे उमेदवार ॲड. ढिकले यांच्या पंचवटीतील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माजी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ५० हजारांहून अधिक मताधिक्याने ढिकले हे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला होता, मात्र मतदारांनी १ लाख ५६ हजारांहून अधिक मतदान करत ढिकले यांच्यावर विश्वास दाखवला. ढिकले हे सतत पाच वर्षे जनमानसात मिसळणारे आमदार असल्याने त्यांची ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याचे दिसून आले. या मतमोजणीमध्ये ॲड. राहुल ढिकले यांना १ लाख ५६ हजार २४६ तर गणेश गीते यांना ६८ हजार ४२९ मते मिळाली आहे.
साधारण तीन वाजेच्या सुमारास ढिकले हे विजयी होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर मतदार संघातील विविध भागात ढिकले यांच्या विजयाचे फलक झळकतांना दिसले. यावेळी ॲड. राहुल ढिकले यांचे निवासस्थानी कुटुंबातील महिलांनी पेढे भरवत औक्षण केले, तर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळवत ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. यावेळी मतदारसंघातील विविध भागातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढिकले यांच्या निवासस्थानी गर्दी केल्याचे दिसत होते. तर राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असलेले गीते समर्थकांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला. दरम्यान पंचवटी परिसरात विविध ठिकाणी ढोल ताशे लावून ढिकलेंच्या स्वागतासाठी समर्थकांची मोठी गर्दी बघायला मिळत होती.
मतमोजणी केंद्रावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहा. पोलीस आयुक्त पद्मजा बढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयाची कारणे : ॲड. राहुल ढिकले यांचे वडील सहकार महर्षी दिवंगत खासदार/आमदार उत्तमराव ढिकले यांची पुण्याई. गेल्या अडीच वर्षांपासून आमदार आपल्या दारीच्या माध्यमातून मतदारांच्या सतत संपर्कात. निवडणूक लढताना मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन. सुनील खुणे, डॉ. सुनील ढिकले, शेखर ढिकले यांनी पडद्यामागे राहून निवडणूकीची हलवलेली विजयाची सुत्रे. लाडकी बहिण योजना आणि मराठा आरक्षणाची सुप्त लाट देखील ढिकले यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरली आहे. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांकडे दुर्लक्ष करत मतदारसंघातील शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचण्याचे केलेले प्रामाणिक प्रयत्न.
पराभवाची कारणे – भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवत नगरसेवक तसेच सलग दोन वर्षे स्थायी समिती सभापती पद. मात्र, ऐनवेळी बंडखोरी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेऊन मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयशी. निवडणूक लढविताना विशिष्ट समाजाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवाराभोवती असलेला गराडा तर सूक्ष्म नियोजनाचा खूप मोठा अभाव, शरद पवार यांची सभा होऊन देखील मतदारसंघात त्यांची जादू चालली नाही. मतदारसंघातील विकासकामांवर न बोलता विरोधी उमेदवारावर पत्रकार परिषद घेत आरोप करणे.





