पेठरोडचा प्रश्न मार्गी ; मतदार आ. ॲड. ढिकले यांच्या पाठीशी ! - CHECKMATE NEWS
राजकीय

पेठरोडचा प्रश्न मार्गी ; मतदार आ. ॲड. ढिकले यांच्या पाठीशी !


जीवनमरणाचा त्रास कायमचा संपवल्याने मतदारांचा ढिकले यांना वाढता पाठिंबा – रंजना भानसी  
नाशिक : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडण्यामध्ये महत्वाचा दुवा मानला जाणाऱ्या पेठ या राष्ट्रीय महामार्गाचे नाशिक महापालिका हद्दीतील रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागले. या कामासाठी महापालिकेने ४५ कोटींची तरतूद केली असून, सदरच्या सहा किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे पेठरोड परिसरातील रहिवाशांची या दुरवस्था झालेल्या रस्त्यापासून कायमची मुक्तता झाली असल्यामुळे माजी महापौर रंजना भानसी यांनी समाधान व्यक्त केले आहे. महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचारादरम्यान भानसी यांनी मतदारांच्या वतीने भावना व्यक्त केल्या. 
             पूर्व विधानसभेचे उमेदवार ॲड. राहुलढिकलें यांच्या प्रचार रॅलीदरम्यान सुरु असलेल्या चौक सभांमध्ये बोलतांना भानसी पुढे म्हणाल्या कि, नाशिक-पेठ या राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण झालेले होते. मात्र, नाशिक महापालिका हद्दीतील हा रस्ता महापालिकेकडे वर्ग केलेला असल्याने महापालिकेने त्याची केवळ वरचेवर डागडुजी करून काम केले होते. नाशिक पेठ हा मार्ग पूर्वी एकेरी होता. मात्र, काही वर्षांपूर्वी महापालिकेने त्याचे रुंदीकरण केले. यामुळे रुंदीकरणावेळी केलेला रस्त्याच्या साईडपट्ट्या प्रत्येक पावसाळ्यात खचून या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी चिखल होऊन रस्त्याची दुरवस्था होते. या वाढीव रस्त्याचा पाया मजबूत नसल्याने या भागातील डांबरीकरणही खचून जात होते. त्याचप्रमाणे पाऊस उघडल्यानंतर रस्त्यावरील चिखल सुकल्याने वाहनांमुळे त्याची धूळ मोठ्याप्रमाणावर उडत होती. या रस्त्यावरील धूळ बसवण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून पाण्याच्या टँकरने फवारवणी करण्यात आली होती. जवळपास वर्षभर स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे काम करण्यासाठी जनआंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी हॉटेल राऊ ते महापालिका हद्द या दरम्यानच्या सहा किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांची मुदत संपली असून नवीन कामे प्रस्तावित करण्यास केंद्र सरकारने दिलेली मुदतही संपली असल्याचे कारण देऊन त्यांचा प्रस्ताव नाकारण्यात आला. यामुळे या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भवितव्य अंधारात सापडले होते. 
            दरम्यान आमदार ढिकले यांनी पेठरोड दुरुस्तीबाबत राज्याच्या विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेला जून २०२३ पूर्वी डांबरीकरण करून घेण्याचे आदेश दिले. मात्र, महापालिकेने निधी नसल्याचे कारण देत, नकारघंटा वाजविली होती. यामुळे मागील पावसाळी अधिवेशनात आमदार ढिकले यांनी विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी तातडीने प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर बांधकाम विभागाने ४५ कोटीची तरतूद करून निविदा प्रक्रिया राबवत पेठरोडच्या सहा किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू केले आहे. या भागात अनेक वर्षांपासून रस्त्याचा रखडलेला प्रश्न काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून कायमचा सोडवला असल्याने नागरिक राहुल ढिकले यांच्या पाठीशी राहणार असून मतदान करून त्यांचे आभार मानणार असल्याचे भानसी यांनी सांगितले.
मनपाच्या विकास निधीतून पेठ रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येत आहे. यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च देखील करण्यात आले असून, अजूनही शेकडो कोटींची कामे सुरु आहे. मात्र, अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमपर्यंत जाण्यासाठी अनेकांना रस्त्यातील खड्यातून बेडूक उड्या मारत आणि कसरत करत जावे लागत असल्याची खंत अनेक नाशिककरांनी आणि नामवंत खेळाडूंनी व्यक्त केली होती. याचाच धागा पकडत ढिकले यांनी पहिले पेठरोड या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा मानस करीत हा प्रश्न विधानसभेत मांडला आणि पेठरोडचे काँक्रीटीकरण सुरु करण्यात त्यांना मोठे यश आले. या रस्त्यावरून हजारो मतदारांची दररोज ये-जा असल्याने येत्या निवडणुकीमध्ये परिसरातील सर्व मतदार ढिकले यांना मतदान करणार असल्याचा शब्द देत नागरिकांनी ढिकले यांना आश्वस्त केले. 

Translate »
error: Content is protected !!