माजी नगरसेवकाकडे सापडला अवैध दारूचा साठा ! - CHECKMATE NEWS
क्राईम

माजी नगरसेवकाकडे सापडला अवैध दारूचा साठा !


उपनगर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे दारू माफियांचे धाबे दणाणले !
नाशिक : उपनगर पोलिसांनी सलग दोन दिवस धडाकेबाज कारवाई करीत जवळपास सव्वा नऊ लाखांचे विदेशी दारूचा साठा पकडत दारू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहे. विशेष म्हणजे या अवैध दारूचा साठा करणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवकाचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा सापडल्याने शहरातील अवैध धंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 
          याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपनगर पोलिसांना जेलरोड परिसरातील सातभाई नगर येथील यो यो वाईन शॉपच्या पाठिमागे गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या पार्किंग समोरील गाळ्यात संशयित अशोक भगंवतराव सातभाई आणि त्यांचा मुलगा अश्विन अशोक सातभाई यांनी अवैधरित्या दारूचा साठा करून ठेवलेला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापा टाकला असता याठिकाणी विदेशी दारूचे ७ लाख ५२ हजार ६४० रुपये किंमतीचे ९८ बॉक्स अवैधरित्या साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात संशयित अशोक भगंवतराव सातभाई आणि त्यांचा मुलगा अश्विन अशोक सातभाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
              तर दुसऱ्या दिवशी देखील उपनगर पोलिसांना संशयित दातार लोखंडे यांने वैदयवाडी मध्ये एक घरात
अवैधरित्या दारूचा साठा करून ठेवलेला असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या आधारे संबंधित ठिकाणी सापळा रचून कारवाई करीत १ लाख ७२ हजार २८० रूपयांचा अवैध विदेशी दारूचा साठा पकडण्यात आला आहे. याबाबत दातार लोखंडे, रा. वैदूवाडी, आगार टाकळी रोड, उपनगर यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
            हि कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ डॉ. मोनिका राउत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी साो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोउनि शशिकांत पवार, पोउनि सुरेश गवळी, पोहवा विनोद लखन, इम्मन शेख, पोना गोविंद भामरे, पोशि सौरभ लोंढे, सुनिल गायकवाड, पंकज कर्पे, संदेश रगतवान, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे यांनी केली आहे.  
दारूचा साठा केल्याप्रकरणी संशयित अशोक भगंवतराव सातभाई यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक सातभाई हे मनपाचे माजी नगरसेवक आहे. त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा कशासाठी केला होता. याचा पोलीस शोध घेणार आहे. तसेच, हि दारू चांगल्या क्वालिटीची आणि ओरिजनल आहे किंवा नाही याची देखील फॉरेन्सिक तपासणी करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिली आहे. 

Translate »
error: Content is protected !!