प्राणघातक हल्ल्यातील युवकाचा दुर्दैवी मृत्यू !
शहरात खुन आणि हाणामारीचे सत्र सुरुच !
नाशिक : शहरात गोळीबाराची घटना ताजी असताना पंचवटी परिसरात रविवारी एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोच गंगापूर रोडवर सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका युवकावर काही सराईत गुन्हेगारांनी सकाळी सकाळी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील जखमी युवकाचा उपचारादरम्यान दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस प्रशासना विरोधात नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
आकाश धनवटे व अथर्व दाते हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी आकाशने अथर्व याच्यावर हल्ला केला होता. त्याबाबत देखील पोलिसात गुन्हा दाखल असून, याच हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी अथर्व याने हा हल्ला केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. आकाश हा वॉटर ग्रेस मध्ये स्वीपरचे काम करत होता. मंगळवारी सकाळी तो कामावर जात असताना ही घटना घडली. आकाश याला उपचारासाठी जिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना दुपारी तीन वाजता आकाशचा मृत्यू झाला. आकाशचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला असता जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.





