“भावना” शून्य प्रेमाचा हृदयद्रावक अंत !
प्रेम प्रकरणाच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने दिली हत्येची सुपारी !दोन अल्पवयीनांसह सात संशयित ताब्यात !हत्या प्रकरणाची काही तासात उकल करण्यात पोलिसांना यश !प्रेम आंधळे असते असं म्हटले जाते. तसेच, प्रेमाला कुठलीही सीमा नसते. मात्र, याच प्रेमाचे रूपांतर वासनेत झाले किंवा हेच प्रेम भावना शून्य बनले की त्याचा अंत किती भयानक होऊ शकतो. हे नाशिकमध्ये झालेल्या हत्याकांडाने सर्वांना दाखवून दिले आहे.
नाशिक : पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जुन्या प्रेम प्रकरणातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका शिक्षिकेने दोन लाखांची सुपारी देत हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या खुनाच्या गुन्ह्यात दोन अल्पवयीन संशयितांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वस्तीगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे, २६, वृंदावन नगर, म्हसरूळ, नाशिक या युवकाची मंगळवार दि. २० रोजी रात्री साडेआठ नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यावर व कानाच्या खाली तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत बुधवार दि. २१ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्याने या हत्येच्या घटनेला वाचा फुटली होती. याबाबत नागरिकांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले. यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिट्ठी मिळाली होती. या हत्येप्रकरणी मयत गगन याचे वडील प्रवीण शहाजी कोकाटे, ५९, रा. प्लॉट नंबर ४८, राधेश्याम बंगला, गजानन महाराज मंदिरामागे, वृंदावन नगर, म्हसरूळ, नाशिक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्योती आमने या करीत आहे.
याबाबत सकाळच्या सुमारास सीबीएस परिसरात असणाऱ्या नाईट कॉलेज मध्ये शिकविणाऱ्या संशयित भावना सुशांत कदम, ४०, रा. वृंदावन नगर, म्हसरूळ हिला ताब्यात घेत चौकशी सुरु केली होती. चौकशी दरम्यान भावना कदम हिने मयत गगन हा मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याने त्याला मारण्याबाबत दोन लाखांची सुपारी दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ सातपूर परिसरातून संशयित संकेत शशिकांत रणदिवे, २०, राधाकृष्ण नगर, अशोकनगर सातपूर, मेहफुज रशीद सय्यद, १८, रा. अशोकनगर सातपूर, रितेश दिलीप सपकाळे, २०, अशोकनगर सातपूर, गौतम सुनील दुसाने, १८, रा. शहीद सर्कल, गंगापूर रोड यांच्यासह दोन अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मंगळवार दि. २१ रोजी रात्री साडेआठ नऊ वाजेच्या सुमारास गगनची हत्या केल्याची कबुली दिली.
भावना कदम आणि गगन कोकाटे यांचे २०२० पासून प्रेम प्रकरण सुरु होते. त्यानंतर भावना हिने हे सर्व सौडून देण्याचे ठरविले होते. मात्र, गगन हा त्यास तयार नव्हता. त्यामुळे वारंवार फोन करणे, शाळेच्या बाहेर येऊन थांबणे, पाठलाग करणे, भेटण्यासाठी तगादा लावणे अशा प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर कुटुंबाला आपल्याबद्दल सांगण्याची वारंवार धमकी देत असल्याने या प्रकाराला भावना हि वैतागली होती. त्यामुळे हि हत्या करण्यासाठी संशयित संकेत रणदिवे याला भावना कदम हिने दोन लाखांची सुपारी दिली होती. त्यानंतर रणदिवे याने १ लाख रुपये ऍडव्हान्स घेत आपले इतर साथीदार जमवले होते. गेल्या सहा महिन्यांपासून गगन याला मारण्याचा प्लॅन सुरु असल्याचे उघड झाले आहे.
मंगळवारी रात्री अंधारात आणि निर्जनस्थळ असलेल्या मेरी कंपाउंड परिसरात मयत गगन कोकाटे आणि भावना कदम हे बोलत उभे होते. यावेळी संशयितांनी येऊन त्यांना हटकण्याचा बहाणा करीत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्वांनी मिळून गगनला मारहाण करण्यास सुरुवात केली असता संशयित भावना हिने घटनास्थळावरून पळ काढण्याचे नाटक केले. त्यानंतर संशयितांनी धारदार शस्त्राने डोक्यात आणि मानेवर वार केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गगनचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर संशयित भावना यांनी गगन मेला असल्याची खात्री करून घेतली होती.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, गजानन इंगळे, रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, देविदास ठाकरे, महेश साळुंके, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, राजेश लोखंडे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, पोअं विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, समाधान पवार, अनुजा येलवे, किरण शिरसाठ, सुकाम पवार तसेच पंचवटी पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, पोहवा कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, सागर कुलकणी, रोहिणी भोईर यांनी केली आहे.





