गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या १५ जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या १५ जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका !


२० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्याना सुखरूप काढण्यात यश !

नाशिक : रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील म्हारे शिवारातील गिरणा नदी पात्राच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेलेले १५ जण अडकल्याची घटना घडली समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाल्याचे दिसून आले. शेवटी या अडकलेल्यांची सुटका सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूजमेंटच्या युट्युब चॅनलला भेट द्या !
             गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व नदी, नाल्यांना पूर आल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने सध्या काहीशी उघडीप घेतली आहे. मात्र, रविवार दि. ४ रोजी म्हारे येथील गिरणा नदीच्या पात्रात काही लोक मासेमारीसाठी गेले होते. गिरणा व मोसम नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे हे १५ जण तब्बल २० तासांहून अधिक वेळ नदीपात्रातून अडकले होते. सोमवार दि. ५ रोजी सकाळपासूनच मनपा प्रशासन, अग्निशमन दल, एसडीआरएफ जवानांकडून या अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र, नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तरुणांना बाहेर काढण्यात त्यांना अपयश येत होते.

           अखेर प्रशासनाने वायुदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेऊन या अडकलेल्या १५ युवकांची तब्बल वीस तासानंतर सुखरूप सुटका केल्याने अडकलेल्या १५ युवकांसह त्यांच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. या वाचविण्यात आलेल्या सर्व तरुणांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार आहे.

Translate »
error: Content is protected !!