पंचवटीतील अवैध धंद्यांची तक्रार करणाऱ्या प्रतिनिधींना मारहाण ! - CHECKMATE NEWS
क्राईमठळक बातम्यानाशिकमहाराष्ट्र

पंचवटीतील अवैध धंद्यांची तक्रार करणाऱ्या प्रतिनिधींना मारहाण !


हल्ला करणाऱ्यांना तक्रारदार पोलीस ठाण्यात येण्याची माहिती दिलीच कोणी !
पंचवटी : (वा.) पोलीस आणि अवैध धंदे चालक यांचे आर्थिक हितसंबंध हे सर्वश्रुत आहे. याविरोधात आवाज उठवणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर हल्ला करण्यापर्यंत मजल गेल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. परंतु यात सत्यता आहे का ? सर्वच पोलीस असे असतात का ? तर नाही काही अपवाद वगळता इतर पोलीस प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असतात. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसी ब्रीद रोजच्या आचरणात खरोखरच अवलंबले जाते का असा प्रश्न पंचवटी परिसरात घडलेल्या एका प्रकरणावरून नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पीडित तक्रारदार महिलेने केलेली तक्रार बघता या संदर्भित पोलिसांविरोधात केलेल्या टीकेला एक प्रकारे दुजोराच मिळतो.

याबाबत कृतिका किशोर पालव, ३९ रा. प्रतिक्षानगर, सायन पूर्व, मुंबई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाल्मीक नगर, वाघाडी, मेरी मैदान या ठिकाणी अवैध जुगारीचा मोठा धंदा सुरू असल्याबाबत धावती मुंबई या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक कृतिका (श्वेता) किशोर पालव यांच्याकडे तक्रार आली होती. याबाबत त्यांनी पंचवटी पोलिसांकडे ईमेलद्वारे चौकशी करून कारवाई करण्याबाबत अर्ज केला होता. याबाबत माहिती घेण्यासाठी कृतिका पालव, महाराष्ट्र गुन्हे रिपोर्टर साप्ताहिकचे संपादक दिलीप चव्हाण, सहकारी पत्रकार वैशाली दबडे, वाहन चालक राम नरेश पाल हे पंचवटी पोलीस ठाण्यात येणार असल्याबाबत येथील पोलीस ठाण्यात फोन करून सांगितले होते. पोलीस ठाण्यात आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना भेटण्याची विनंती केली असता मधुकर कड यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील यांना भेटण्यास सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना पंचवटीतील सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर बाबू नाडर, हुसेन, राफा व धूरिया नामक संशयित काठी फिराव, घोडी, रमी, क्रिकेट मॅच वरील सट्टा असे अवैध जुगार मोठ्या प्रमाणावर चालवत असल्याचा लेखी तक्रार अर्ज देखील देण्यात आला. यावर कारवाई करून आपणास त्याबाबत माहिती कळवण्यात येईल असे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी तक्रारदारांना सांगितले.

त्यानंतर तक्रारदार पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच रस्त्यावर काही अज्ञात संशयित महिला व गुन्हेगारी वृत्तीच्या संशयितांनी कृतिका पालव व त्यांच्या सहकाऱ्यांची गाडी अडवत मारहाण करण्यास सुरुवात करत गाडीच्या काचा फोडल्या. या मारहाणीत पत्रकार वैशाली दबडे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र देखील गहाळ झाले. तसेच पोलिसांची मदत मिळावी यासाठी मोबाईल द्वारे फोन करत असताना कृतिका पालव यांचा मोबाईल फोन संशयितांनी जबरदस्तीने हिसकावून घेत रस्त्यावर फेकून दिला. तक्रारदार यांनी कशीबशी संशयितांच्या तावडीतून सुटका करून घेत पंचवटी पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगत आमच्या सहकाऱ्यांना वाचवा अशी विनंती केली थोड्याच वेळात पोलिसांसह कृतीका पालव यांचे सहकारी पोलीस ठाण्यात जखमी अवस्थेत आले. मात्र त्या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण व लुटमार करणारे संशयित उपस्थित असल्याचे तक्रारदार यांनी सांगून देखील त्यांच्यावर कुठलेही प्रकारची कारवाई झाली नाही हे देखील दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दोन दोन राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंबहुना पोलीस ठाण्याच्या समोरच माध्यम प्रतिनिधींना अशा प्रकारे मारहाण करत लुटमार केली जात असेल आणि योग्य तो न्याय पिडीताला मिळत नसेल तर सर्वसामान्यांचं काय होत असेल असा सवाल या निमित्ताने निर्माण होत आहे. असे म्हणतात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. पीडित महिला पत्रकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन राष्ट्रपती पदक विजेते पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांचे अति निकटवर्तीय यांनी जणूकाही सर्वसामान्य नागरिकांना नाही तर अवैध धंदे चालकांनाच संरक्षण देण्यासाठी पुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून येत बदली करून घेतली का असा प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली नाहीतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यां विरोधात राज्यपाल, मुख्यमंत्री गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे न्याय मागणार असल्याचे सांगितले.

पंचवटी पोलिसांना स्वतःपेक्षा गुन्हेगारांवर जास्त विश्वास : पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या तक्रारदार पत्रकारांवरील हल्ला व लुटमार विषयी सर्वच स्तरातून नाराजीसह आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हद्दीतलं सोडा पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात व पोलीस ठाण्यासमोरच जर अशा प्रकारे पत्रकारांना मारहाण होत असेल तर मग तेथील कारभार कसा असेल आणि कारभारी कशा पद्धतीची पोलिसिंग करतात याबाबत प्रश्न कल्लोळ निर्माण झाल्या वाचून राहत नाही. तक्रारदारांना संशयीतांकडून मारहाण व लुटमार झाल्यानंतर संबंधित पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारीच तुम्ही तक्रार दाखल करू शकतात. मात्र संशयित हे खुनशी वृत्तीचे दिसत असून पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर पुन्हा हल्ला करू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या राहत्या ठिकाणी जाऊन तक्रार करा असा सल्ला देत असतील तर याचाच अर्थ पंचवटी पोलिसांना स्वतः पेक्षा गुन्हेगारांवर किती विश्वास आहे हेच अधोरेखित होते.


Translate »
error: Content is protected !!