शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेला अटक ! - CHECKMATE NEWS
क्राईमनाशिक

शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेला अटक !


गांजा तस्करी प्रकरणात तेलंगणा पोलिसांची कारवाई !

पंचवटी : गांजाच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे हिला अटक केली आहे. पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी ताठे हिला ताब्यात घेतल्यानंतर खळबळ निर्माण झाली असून पोलीस तिचा मुलगा विकास ताठे याचा शोध घेत आहे. या अटकेमुळे गांजा तस्करांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

तेलंगणाच्या दामेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ जून रोजी १९० किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. या प्रकरणात बीड आणि अहमदनगरच्या दोघा गांजा तस्करांना अटक करण्यात आली होती. तपासा दरम्यान लक्ष्मी ताठेचे नाव पुढे आल्याने १ महिन्यानंतर पोलिसांनी ताठे हिला बेड्या ठोकल्या आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाने लक्ष्मी ताठेची या आधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. २०१८ मध्ये सुध्दा ओडिसा येथून गांजाचा मोठा साठा आणल्याप्रकरणी महिनाभर फरार असलेल्या संशयित लक्ष्मी ताठे हिला मध्य प्रदेशातील सेंधवा येथून नाशिक पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले होते.

पंचवटी परिसरातील तपोवन येथे १२ जून २०१८ रोजी गुन्हे शोध पथकाच्या युनिट एकने कारवाई करीत एका मालवाहतूक करणाऱ्या आयशर मधून जवळपास सातशे किलो गांजा जप्त केला होता. त्यानंतर तपासादरम्यान त्याची व्याप्ती वाढून पुढे हा गांजा जवळपास १८०० ते २ हजार किलोच्या घरात गेला होता. या गुन्ह्यामध्ये मुख्य संशयित आरोपी म्हणून लक्ष्मी ताठेला अटक करून तिच्या जावयासह ११ संशयित आरोपींना गजाआड करण्यात आले होते.

सध्या लक्ष्मी ताठे हिला विधानसभेचे वेध लागले होते. तिने देवळाली मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरु केली होती. यासाठी मतदार संघात फिरून मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या होत्या. मात्र, गांजा तस्करी प्रकरणात अटक झाल्याने तिच्या निवडणूक लढविण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.


Translate »
error: Content is protected !!