स्मार्ट सिटी मध्ये अमरधामच मृत्यू शय्येवर !
अमरधाम इमारतीच्या छतातून पाणी गळतीमुळे नागरिकांचे हाल !
देवानंद बैरागी :
नुकताच पावसाळा सुरु झाला असून, शहरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. या किरकोळ पावसामुळे पंचवटी आणि जुने नाशिक परिसरात असलेले अमरधामच्या छताला गळती लागली आहे. यामुळे याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अमरधामची गळती तात्काळ रोखण्यासाठी उपायोजना करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे शहर भलेही करोडो रुपये खर्च करून स्मार्ट बनविले जात आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांचा शेवटचा मार्ग खडतरच असल्याचे दुर्दैवी चित्र बघायला मिळत आहे. या अवस्थेकडे बघून सध्या स्मार्ट सिटीमध्ये अमरधामच मृत्यू शय्येवर असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या वतीने करोडो रुपयांचा चुराडा करून नको त्या ठिकाणी अवास्तव कामे सुरु आहे. स्मार्ट सिटीच्या या मनमानी कारभाराला अनेकदा नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी देखील कडवा विरोध केला आहे. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीने कुठल्याही विरोधाला न जुमानता आपली कामे मनमानी पद्धतीने सुरूच ठेवली असल्याचे नाशिककरांनी अनुभवले आहे. तर दुसरीकडे मनपाच्या वतीने देखील लोकप्रतिनिधींनी नको त्या ठिकाणी नागरिकांच्या कररुपी पैशांची उधळपट्टी केल्याने शहरात कुठेही म्हणावा तसा विकास दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नाशिककरांकडून विविध कराच्या माध्यमातून करोडो रुपये वसूल करून त्यातून फक्त लोखंडी बाकडे, ग्रीनजीम, उद्याने, खेळणी, समाज मंदिरे उभारण्यात पैसा पाण्यासारखा खर्च केला जात आहे.

दुसरीकडे मात्र, नाशिकमधील दोन महत्वाचे अमरधामच शेवटचा घटका मोजताना दिसत आहे. शहरातील अडचणींचा सामना नाशिककर गुपचूप सहन करत आहे. मात्र, गरीब,श्रीमंत आणि मध्यम वर्गीय मानवी जीवनात शेवटचा प्रवास हा अमरधाम येथेच होत असतो हे अंतिम सत्य आहे. मात्र, याच्याशी मनपा प्रशासनाला काही देणेघेणे नसल्याचे दुर्दैवी चित्र पंचवटी आणि जुने नाशिक परिसरातील अमरधाम येथे गेल्यावर दिसून येते. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. नुकताच शहरात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरु केली आहे. पावसाच्या आगमनामुळे नाशिककर सुखावले आहे. मात्र, नाशिकमधील अमरधाम येथे ज्या नागरिकांनी या दोन दिवसात हजेरी लावली आहे. त्यांना खूपच कडवट अनुभव आला आहे. या दोन्ही अमरधाममधील छतामधून मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची गळती सुरु झाली आहे.
छतातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना आणि नातलगांना उभे राहणे मुश्किल झाले आहे. प्रत्येक बेडजवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळत असून हे पाणी याच ठिकाणी साचून राहत असल्याने अंत्यसंस्कार करावा कसा हा यक्षप्रश्न नातेवाइकांसमोर उभा ठाकत आहे. त्यात अनेकदा या साचलेल्या पाण्यातून चालताना अनेकांचे पाय घसरून पडण्याच्या घटना घडू लागल्या आहे. अंत्यसंसकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध येत असल्याने त्यांना या साचलेल्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपा प्रशासन अधिकारी तथा प्रशासक डॉ. कैलास करंजकर यांनी तात्काळ पंचवटी, जुने नाशिक येथील अमरधाम यासह शहरातील सर्वच अमरधामाची पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जुने नाशिक परिसरातील अमरधामच्या इमारतीला रंगरंगोटी देऊन इमारत सुस्थितीमध्ये असल्याचा देखावा करण्यात आला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या इमारतीमध्ये गेल्यास अनेक ठिकाणी छताचे प्लास्टर उखडून गेल्याचे दिसून येत आहे. या उखडलेल्या प्लास्टरच्या जागेतून मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे. त्यामुळे हि संपूर्ण इमारतच धोकादायक झाल्याचे दिसत आहे.
पंचवटी आणि जुने नाशिक परिसरातील अमरधाम येथील इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात जुने झाले आहे. त्यातच या अमरधामच्या छताखाली दररोज अनेक अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने इमारतीचा ढाचा देखील कमकुवत झाला असल्याचा अंदाज नागरिकांनी वर्तविला आहे. यासाठी या इमारती जमीनदोस्त करून नव्याने अमरधामची निर्मिती करावी असे देखील अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.
या अमरधाममध्ये काही युवक आलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांची निस्वार्थ मदत करीत असतात. हे युवक याठिकाणी साचलेले पाणी झाडून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहे. मात्र, छताची गळती कायम सुरु राहत असल्याने झाडू तरी किती वेळा मारून पाणी बाहेर काढायचे असा प्रश्न त्यांना देखील पडला आहे. त्यामुळे संपूर्ण अमरधाम इमारतीमध्ये पाण्याचे डबके साचलेले दिसून येत आहे.





