भक्तासोबत विराजमान असलेले एकमेव अतिप्राचीन विठ्ठल-रुख्मिणी मंदिर ! - CHECKMATE NEWS
धार्मिक

भक्तासोबत विराजमान असलेले एकमेव अतिप्राचीन विठ्ठल-रुख्मिणी मंदिर !


श्री काळाराम मंदिरापेक्षाही प्राचीन मंदिर !

नाशिक : प्रचलित नसल्याने अनेक प्राचीन अशा ठेव्यांपासून मनुष्यप्राणी वंचित राहतो. एखादी मौल्यवान बाब त्याच्या आसपास असूनदेखील केवळ त्याविषयी ज्ञान नसल्याने तो पारखा झाल्याची अनेक उदाहरणे घडतात. त्याचप्रमाणे नाशिकचे एक अतिप्राचीन विठ्ठल मंदिर भाविकांना पारखे झाले असून, प्रसिद्ध श्री काळाराम मंदिराच्या आधीपासून असलेले हे विठ्ठल मंदिर आजही भाविकांच्या प्रतीक्षेत आहे. आषाढी एकादशीला भक्तांना विठूमाऊलीच्या चरणांची आस लागलेली असते. मात्र, येथे साक्षात विठ्ठल भगवंतालाच भक्तांची आस लागली असल्याचा इतिहास आहे. विठ्ठल- रुख्मिणी सोबत भक्त विश्वनाथाची मूर्ती असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर म्हटल्यास वावगे ठरू नये. हे अतिप्राचीन विठ्ठल मंदिर रामकुंड येथील पार्किंजवळ असलेल्या चतुःसंप्रदाय आखाड्यात असलेल्या दीनबंधू सभागृहासमोर आहे. काय आहे या अतिप्राचीन विठ्ठल मंदिमंदिराचा इतिहास जाणून घेऊ.
           रविवार दि. ६ रोजी आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. यासाठी वैष्णव आणि वारकऱ्यांच्या माहितीसाठी एका अतिप्राचीन आणि दुर्लक्षित अशा वैभवशाली मंदिराचा इतिहास जाणून घेऊ. श्रीकाळाराम मंदिराची उभारणी इसवी सन १७८२ मध्ये करण्यात आली आहे. तर त्यापूर्वी म्हणजे इसवी सन १७५४ मध्ये या विठ्ठल मंदिराची स्थापना झालेली असून, पेशव्यांचे सरदार तात्यासाहेब खर्डीले यांनी हे मंदिर उभे केले आहे. मंदिर उभारणीसाठी त्याकाळी पाच हजार रुपये खर्च आला असल्याबाबत मनपा कार्यालयामध्ये नोंद असल्याची माहिती मंदिराचे पुजारी आणि विश्वनाथ पंचभैये यांचे वंशज अतुल पंचभैये यांनी दिली. गोदावरी-अरुणा संगमाजवळ (आताचे रामकुंड) असलेल्या चतु:संप्रदाय आखाड्यात हे विठ्ठलाचे मंदिर आहे. काळ्या पाषाणात असलेली ही मूर्ती स्वयंभू व मोठी लोभस आहे. समवेत डाव्या बाजूला रखुमाई असून, उजव्या हाताला भक्त विश्वनाथाची मूर्ती आहे. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडातील असून, मंदिरामध्ये मानवी स्वरूपातील गरुडाची दगडी मूर्ती आहे. विठ्ठल-रुख्मिणी आणि भक्त विश्वनाथ या मूर्तींच्या डोक्यावर पेशव्यांची पगडी असल्याने त्या विलक्षण भासतात. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर प्रथमदर्शनी ही काळारामाचीच मूर्ती असल्याचा भास होतो. हे येथील मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. या स्थानालाही पंढरपुर इतकेच महत्व असून, ब्रह्मपुराणात त्याचा उल्लेख असल्याचे मंदिराचे पुजारी पंचभैये सांगतात. नाशिकमध्ये अशी अनेक पुरातन मंदिरे असून, त्याची माहिती नाशिककरांना होणे गरजेचे आहे .
भगवंतासोबत भक्त असा दुर्मिळ योग : भक्तासाठी भगवंत कृपानिधान असतो. त्याच्या चरणाजवळ जागा मिळावी अशी भक्ताची इच्छा असते. मात्र, या अतिप्राचीन विठ्ठल मंदिरात भक्त विश्वनाथ भगवंतासमवेत विराजमान आहेत. विठ्ठलासोबतच त्यांचीही षोडशोपचारे पूजा केली जाते. भक्तीची परिसीमा गाठल्याने आपल्याबरोबर भक्ताला स्थान देऊन परमेश्वराने दोघांमधली दरीच मिटवून टाकली असल्याचे जाणवते.
अशी आहे आख्यायिका : विठोबा मंदिराची आख्यायिका प्रसिद्ध आहे. गोदावरीचे पावित्र्य जाणून विश्वनाथ नावाचा एक भक्त स्नानासाठी आलेला होता. त्याने कपालेश्वराजवळ पूजा केली व गोदावरी-अरुणा संगमाजवळ (आताचे रामकुंड) असलेल्या गालव ऋषींच्या आश्रमात गेला. तेथे त्याला गालव ऋषींनी भीमातीरी असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लावली. आषाढी एकादशीस मोठा उत्सव असल्याने दर्शनाला चल म्हणाल्यावर त्याने पंढरपूरला येण्याचा मानस प्रकट केला. मात्र, विश्वनाथ जरा जर्जर असल्याने गालव ऋषी त्यांना न घेताच गेल्याने इकडे नाशिकला त्यांनी विठ्ठलाचे दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. महिनाभरानंतरही दर्शन होईना म्हटल्यावर भक्त विश्वनाथ व्याकुळ झाले. परीक्षा पाहण्याच्या हेतूने साक्षात विठ्ठल पंचपक्वान्नाचे ताट घेऊन आले. मात्र, भक्त विश्वनाथ त्याकडे बघेना ! अनेक युक्त्या केल्यानंतरही विश्वनाथाने तोंड उष्टावले नाही म्हणून विठ्ठल प्रसन्न झाले व याच ठिकाणी राहण्याचे वचन दिले.
मंदिरात प्रवेश केल्यावर समोरील गाभाऱ्यात तीन काळ्या पाषाणमूर्त्या दिसतात. ज्या पद्धतीने काळाराम मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मुर्त्या आहे. तशाच मुर्त्या येथे दिसतात. मात्र,यातील दोन मुर्त्या विठ्ठल- रुख्मिणी तर एक विठ्ठलाच्या उजव्या हाताला भक्त विश्वनाथाची मूर्ती आहे. मुर्त्यांची मागील असलेली आरास देखील काळाराम मंदिरासारखीच आहे.

या अतिप्राचीन विठ्ठल मंदिरात दशमी ते प्रतिपदा पर्यंत कीर्तन सुरु असते. प्रतिपदेला उत्सवाची सांगता करण्यात येते. आषाढी एकादशीला सकाळी साडेआठ ते बारा वाजेपर्यंत महाअभिषेक करण्यात येतो. त्यानंतर नैवद्य दाखवून आरती करण्यात येते. दर महिन्याच्या शुद्ध आणि वद्य एकादशीला पूजा केली जाते. तर दररोज याठिकाणी सकाळ संध्याकाळ पूजाअर्चा केली जाते. याठिकाणी हभप गंधे महाराजांची देखील अनेक कीर्तने झाली आहे. 

अतिप्राचीन विठ्ठल मंदिर हे संपूर्ण काळ्या पाषाणात बांधण्यात आले आहे. मात्र, याठिकाणी भाविकांची येजा कमी असल्याने देणगी कमी येते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी मंदिर गळायला लागले असता. संपूर्ण मंदिराची तात्पुरती डागडुजी करून रंगकाम करण्यात आले आहे. या रंगकामामुळे मात्र, मंदिराचे मूळ दगडी स्वरूप झाकले गेले आहे. प्रशासनाने आणि भाविकांनी मदत केल्यास मंदिराचा ठेवा जतन केला जाऊ शकतो. 
आम्ही विश्वनाथ पंचभैये यांचे वंशज असून, या मंदिराचे पुजारी आहोत. या पांडुरंगाच्या मूर्तीसोबत त्यांच्या परमभक्ताची मूर्तीदेखील प्रतिष्ठित असल्याने हे मंदिर वेगळे मानले जाते. आषाढी एकादशीला येथे प्रत्यक्ष पांडुरंगाचा वास असतो. ज्यांना पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य नाही त्यांनी येथे दर्शन घ्यावे. याला प्रति पंढरपूर देखील म्हणतात. : अतुल पंचभैये, मंदिराचे पुजारी

Translate »
error: Content is protected !!