१०० कोटींच्या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची समस्या सुटणार !
छत्रपती संभाजी नगर मार्गावर होणार दोन उड्डाणपूल !
नाशिक : नाशिक येथील छत्रपती संभाजीनगर मार्गावर नांदूर नाका पाठोपाठ आता मिरची चौकातील उड्डाणपूल उभारण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे संभाजीनगर रोडवर १०० कोटी रुपयांचे दोन उड्डाण पूल बांधण्यात येणार असून अपघात व वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका होणार आहे. या उड्डाणपुलामुळे शहरात होणारी वाहतूक कोंडीची मोठी समस्या मार्गी लागणार असल्याने लाखो मतदार ढिकले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे माजी नगरसेवक सुरेश खेताडे यांनी आ. ढिकले यांच्या प्रचारादरम्यान आयोजित चौक सभेमध्ये सांगितले.
गेल्या वर्षी संभाजीनगर रोडवरील मिरची हॉटेल चौकात झालेल्या भीषण अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मिरची हॉटेल चौक व नांदूरनाका येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती. या दोन्ही उड्डाणपुलांमुळे छत्रपती संभाजीनगर मार्गावरील महापालिका हद्दीतील वाहतूक सुरळीत होणार आहे. नाशिक महापालिका हद्दीत मागील वर्षी ८ ऑक्टोंबर २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगर मार्गावर हॉटेल मिरची चौकात खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला होता. त्यात बसला लागलल्या आगीत १३ प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत अपघाताची कारणे शोधण्याबरोबरच ब्लॅक स्पॉट शोधून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने संयुक्त सर्वेक्षण केले. त्यात महापालिका हद्दीमध्ये अपघाताचे २६ ब्लॅक स्पॉट आढळले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक कोंडी नित्याची आहे. त्यात लग्नसराईमध्ये हे प्रमाण खूप मोठे असते. यामुळे नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार ॲड. ढिकले यांनी नांदूर नाका येथे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. तो उड्डाणपूल राज्य सरकारने मंजूर केला आहे.
त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात सरकारने ५५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या असून त्यात मिरची हॉटेल चौकातील उड्डाणपुलासाठी ५० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या मार्गावर दोन उड्डाणपूल अस्तित्वात येणार असल्याने नाशिक महापालिका हद्दीत छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती खेताडे यांनी उपस्थित मतदार बंधू भगिनींना दिली. उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतून परिसरातील नागरिकांची सुटका होणार असल्याने उपस्थित मतदारांनी यंदाही ॲड. राहुल ढिकले यांनाच मतदान करीत विधानसभेत पाठविणार असल्याचे जाहीर केले आहे.
संभाजी नगर रोडवरील कॉंक्रीटीकरण तसेच उड्डाण पुलाच्या कामाचे भूमीपूजन मार्च महिन्यात संपन्न झाले आहे. उड्डाण पूल उभारणीसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व चाचण्या पुर्ण झाल्या आहेत. लवकरच प्रत्यक्षात कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती प्रचारादरम्यान सुरु असलेल्या चौक सभांमध्ये ॲड. ढिकले यांनी दिली आहे.





