घरगुती गॅसचा काळाबाजार करणारे दोन अड्डे उध्वस्त ! - CHECKMATE NEWS
क्राईम

घरगुती गॅसचा काळाबाजार करणारे दोन अड्डे उध्वस्त !


शेकडो सिलेंडरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत !
नाशिक : नाशिक शहरामध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे. नाशिकमध्ये पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करणारे दोन अड्डे पोलिसांनी उध्वस्त केले आहे. यामध्ये दोनशेच्यावर भरलेले आणि रिकामे गॅस सिलेंडर, गॅस भरण्यासाठी असलेले पिस्टन, इलेक्ट्रिक वजनकाटे असा जवळपास साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईवरून शहरात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा काळाबाजार हा अधिकाऱ्यांना हाताशी धरून केला जात असल्याचे उघड झाले आहे. अशा पद्धतीने कायम कारवाया करून अवैध गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे अड्डे उध्वस्त करून सामान्यांना दिलासा देण्याची मागणी आणि गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांना या टाक्या उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सीविरोधात देखील कारवाई करण्याची मागणी महिला वर्गाकडून करण्यात येत आहे. 
           भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खडकाळी सिग्नलच्या बाजूला असलेल्या मिल कंपाऊंडच्या आवारात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसच्या टाक्यांमधून गॅस वाहनांमध्ये भरून काळाबाजार केला जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी छापा टाकला असता याठिकाणी संशयित नावीद अख्तार काझी हा गॅसचा काळाबाजार करतांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून भारत भरलेले गॅसचे १३ आणि रिकामे ६९ सिलेंडर, एच. पी. गॅस कंपनीचे १२ सिलेंडर, गॅस भरण्यासाठी असलेले दोन पिस्टन पंप, इलेक्ट्रिक दोन वजनकाटे असा एकूण १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, संशयित शाकीर मोहम्मद शेख याच्या ताब्यातून भारत गॅसचे ३ भरलेले आणि ३८ भारत गॅसचे रिकामे सिलेंडर, एच. पी. गॅसचे रिकामे ३७ आणि भारत गॅसचे व्यावसायिक वापराचे रिकामे १५ सिलेंडर, एच. पी. गॅसचे व्यावसायिक वापराचे २ रिकामे सिलेंडर, गॅस भरण्यासाठी असलेले चार पिस्टन पंप आणि ४ इलेक्टिक वजनकाटे असा एकूण १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई योगेश भास्कर माळी यांनी संशयित नावीद अख्तार काझी, ३८, रा. जुम्मा मस्जिद बिल्डिंग, नाईकवाडीपुरा, जुने नाशिक, शाकीर मोहम्मद शहा, २५, र. वाघोबा मंदिराजवळ, सुंदर नगर, देवळाली गाव, नाशिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
           तर दुसऱ्या कारवाईमध्ये पंचवटी परिसरातील चिंचबन परिसरातील कालिका मंदिराजवळ असलेल्या एका शेडमध्ये संशयित शुभम राजेंद्र सानप, २४, रा. कालिका मंदिराजवळ रूम नं. २, चिंचबन रोड, पंचवटी हा गॅसचा काळाबाजार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवार दि. १५ रोजी संध्याकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता संशयित शुभम सानप हा घरगुती गॅसच्या टाक्यांमधून रिक्षांमध्ये गॅस टाकताना आढळून आला. या संशयितांकडून पोलिसांनी दीड लाख रुपये किंमतीच्या एम. एच. १५  एफ. यु. ६८३१, एम. एच. १५ ई. एच. ०२१४, एम. एच. १५ एफ. यु. ००८२ या क्रमांकाच्या रिक्षा, दहा हजार रुपये किंमतीचे गॅस इलेक्ट्रिक मोटार पंप, चार हजार रुपयांचे दोन वजनकाटे, २८ हजार ५०० रुपयांच्या १९ भारत गॅस कंपनीच्या गॅसच्या टाक्या असा एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
घरगुती सिलेंडर मधून काही किलो गॅस काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. सामान्य नागरिक गॅस सिलेंडर घेताना त्याचे कुठलेही वजन करून घेत नाही. याचाच फायदा गॅस सिलेंडरचे वितरण करणारे कर्मचारी घेतात. आणि त्याचा मोठा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. गॅसचा काळाबाजार होत असल्याने सर्व नागरिकांनी गॅस सिलेंडर घरी आले असता त्याचे वजन कर्मचाऱ्याकडून करून घेणे गरजेचे आहे. सर्व नागरिकांनी असे करण्यास सुरुवात केल्यास काही प्रमाणात गॅसच्या काळाबाजार करण्याला आळा बसू शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 
 
कारवाई अगोदरच मिळते खबर – राजरोसपणे भरवस्तीत बिनदिक्कतपणे सुरु असलेल्या या अवैध गॅस भरणा अड्डे चालकांना मात्र ज्या दिवशी पोलीस कारवाई होणार आहे त्याची माहिती बिनचूक मिळते. त्यामुळे कारवाईच्या दिवशी बरेचसे अड्डे बंद सापडत असतात. त्यामुळे एक दोन अड्ड्यांवर कारवाई केल्याचा अहवाल वरिष्ठांपर्यंत दिला जातो. या अवैध गॅस भरणा अड्डे चालकांचा पोलीस खात्यातील खबरी कोण हे देखील पोलीस प्रशासनाने शोधण्याची गरज आहे.
अवैध गॅस भरणा अड्डे म्हणजे बॉम्ब – शहरातील अनेक भागात सुरु असलेले घरगुती गॅस सिलेंडर वाहनांमध्ये भरून देण्याचे अड्डे हे दाट लोकवस्तीत आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारे सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने भविष्यात एखादी मोठी दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी येवला शहरात गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये भरून देण्याच्या प्रकरणात ८ ते १० प्रवासी जखमी झाले होते तर परिसरातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची घटना घडली होती.

Translate »
error: Content is protected !!