प्राणघातक हल्ल्यातील कोयता गँग जेरबंद !
मागील भांडणाच्या कारणावरून केला होता कोयत्याने हल्ला !
नाशिक : पंचवटी परिसरात युवकावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या कोयता गँगमधील चौघा संशयितांच्या पंचवटी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. या कोयता गँगने भर रस्त्यात प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मागील भांडणाच्या किरकोळ वादातून हा प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, या हल्ल्यात सहभागी असलेल्या अजून काही संशयितांचा पोलीस शोध घेत आहे.

रविवार दि. २९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रोहित अनिल माळी, २८, रा. अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगला जवळ, पंचवटी, नाशिक आणि त्याचे मित्र अथर्व सानप, आदित्य भामरे, प्रशांत पाटील आणि सचिन निकम हे अमृतधाम परिसरातील चिअर्स बिअर शॉपी समोर उभे असताना संशयित उमेश चांडोले, वैभव उर्फ नारायण भडांगे, विशांत उर्फ काळु भोये रा. बिडी कामगार नगर आडगाव नाशिक आणि त्यांच्या सोबत असलेल्या आठ ते नऊ संशयितांनी रिक्षा आणि दुचाकीवरून येत काहीही कारण नसताना फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करीत मारहाण करू लागले होते. तसेच, यावेळी संशयित उमेश चांडोले याने त्याच्याकडील कोयत्याने रोहित माळी याच्या कपाळावर आणि कानावर वार करत तुम्हाला परत पाहून घेऊ अशी धमकी देत घटनास्थळावरून फरार झाल्याची घटना घडली होती. भर रस्त्यात झालेल्या फिल्मीस्टाईल हल्ल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. गंभीररीत्या जखमी झालेल्या रोहित माळी याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याबाबत पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत संशयित उमेश भास्कर चांडोले, २६, रा. तारवाला नगर, लामखेडे मळा, पंचवटी, स्वप्नील दिलीप सांगळे, २७, रा. स्वामी समर्थ केंद्राशेजारी, बिडी कामगार नगर, आडगाव शिवार, वैभव उर्फ नारायण सुभाष भडांगे, २१, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिडी कामगार नगर, अमृतधाम, पंचवटी, विशांत उर्फ काळू राजाराम भोये, २८, रा. बिडी कामगार नगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक यांना प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक केली आहे. तसेच, त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या इतर साथीदारांचा देखील पोलीस शोध घेत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहे.





