सेवानिवृत्त मनपा अधिकाऱ्यासह पत्नीवर गुन्हा दाखल !
अपसंपदा जमविल्या प्रकरणी महाजन दांपत्य गोत्यात !
नाशिक : नाशिक महानगर पालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्या विरोधात अपसंपदा जमवल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे अपसंपदा जमविण्यामध्ये त्यांच्या पत्नीने देखील त्यांना साथ दिल्याने त्यांना देखील या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. या कारवाईमुळे मनपा अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत नितीन नारायण पाटील, पोलीस निरीक्षक नेमणुक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी संशयित आरोपी अनिल चुडामान महाजन, सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी महानगर पालिका नाशिक आणि निशा अनिल महाजन (खाजगी इसम) यांच्याविरोधात १ कोटी ३१ लाख ४२ हजार ८६९ इतकी अपसंपदा जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संशयित अनिल चुडामान महाजन यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून नाशिक महानगर पालिका येथे कार्यरत असतांना दि. २२ ऑक्टोबर १९८६ ते दि. ३१ मे २०१८ दरम्यान कायदेशीर उत्पन्ना पेक्षा १ कोटी ३१ लाख ४२ हजार ८६९ रुपये कायदेशीर उत्पन्ना पेक्षा ४२ टक्के एवढी अपसंपदा जमा केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले आहे. तसेच, ही अपसंपदा संपादित करण्यासाठी निशा अनिल महाजन यांनी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्या विरोधात देखील मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर करीत आहे.





