खुनातील आरोपी अद्याप मोकाटच !
पोलिसांचे नेटवर्क झाले कमकुवत !
नाशिक : म्हसरूळ परिसरातील एका वृद्ध महिलेचा दिवसाढवळ्या घरात घुसून विळ्याने हल्ला करीत निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेला जवळपास तीन आठवडे उलटून देखील पोलिसांच्या हाती कुठलेच धागेदोरे अद्याप लागलेले नसून खुनी मोकाट फिरत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. यामुळे पोलिसांचे नेटवर्क कमकुवत झाले असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. नव्याने पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी तरी या गुन्ह्यातील संशयिताला तात्काळ शोधावे अशी मागणी देखील केली जात असून त्यांच्यासमोर देखील या आरोपीला बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
दिंडोरी रोडवरील गुलमोहर नगर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील राधानंद निवास याठिकाणी राहणाऱ्या कुसुम सुरेश एकबोटे (८०) या ज्योती गोविंद एकबोटे या मुलीसोबत राहतात. बुधवार (दि.१०) रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास कुसुम एकबोटे या घरात एकट्या असताना अज्ञात हल्लेखोराने विळ्याच्या साहाय्याने कुसुम यांच्या डोक्यावर आणि छातीवर विळ्याच्या साहाय्याने वार करत खून केल्याची संतापजनक घटना घडली होती. खून का करण्यात याचे कारण अदयाप गुलदस्त्यात आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या वतीने पाच पथके तयार करून संशयिताच्या मागावर पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांना संशयितांचा कुठलाही माग मिळाला नसल्याने हि सर्व पथके रिकाम्या हाताने परत आली होती. त्यानंतर या खुनाच्या गुन्ह्याचा तपास संथ गतीने सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अतुल डहाके यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यानंतर देखील अद्याप कुठलाही तपास होत नसल्याने पीडित कुटुंबियांनी आणि स्थानिक रहिवाशांनी पोलीस प्रशासनाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून या खुनाच्या घटनेबाबत बाजूला राहणाऱ्या एका युवकावर संशय व्यक्त केला जात आहे. सध्या हा युवक त्याच्या आईला घेऊन गायब असल्याने आणि त्याचा फोन देखील बंद येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. मात्र, त्याची कुठलीच माहिती मिळत नसल्याने पोलीस देखील हताश झाल्याचे दिसत आहे.
पोलिसांचे सर्वात मोठे मदतनीस, माहिती पुरविणारे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये वावरणारे नागरिक खबरी असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी स्वतःला सिंघम आणि दबंग अधिकारी म्हणून वावरताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचा सामान्य नागरिकांशी हवा तसा संपर्क राहिला नसल्याने पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क हे मोठ्या प्रमाणात कमकुवत झाल्याचे आणि ठप्प पडल्याचे दिसत आहे. यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा सामान्य नागरिकांशी संपर्क वाढवून त्यांच्याशी संवाद वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे परिसरात घडणाऱ्या दैनंदिन किंवा संशयास्पद घटनांची माहिती पोलिसांना मिळू शकेल.
शहरात खून आणि चैन स्नॅचिंग सारखे गंभीर गुन्हे घडत आहे. मात्र, पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेचे अधिकारी दररोज एक दोन दुचाकीसह चोर पकडल्याचे दाखवत आपली पाठ थोपटून घेताना दिसत आहे. मात्र, खऱ्या अर्थाने आव्हानात्मक असलेल्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार फरार असून त्याकडे लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना वेळ आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे. त्यात दुसरीकडे शहरभर गावगुंडांचे अनधिकृत फलक झळकत असून त्याकडे संपूर्ण पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून गुन्हेगारांचे उदात्तीकरण होत असल्याचे दुर्दैवी चित्र देखील बघायला मिळत आहे.





