श्रावण महिन्यासाठी श्री कपालेश्वर मंदिर संस्थान सज्ज !
श्रावणात मंदिर पहाटे ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत राहणार खुले !
नाशिक : येत्या काही दिवसात हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरु होत आहे. नाशिकमध्ये असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता यंदाही भाविकांच्या सुरक्षेच्या आणि सुरळीत दर्शनाच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच, श्रावण महिन्यात कपालेश्वर मंदिर पहाटे ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती अध्यक्ष अक्षय कलंत्री यांनी दिली.

धार्मिक दुष्ट्या अतिशय पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्याला ५ ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. यंदा तब्बल ७१ वर्षांनंतर श्रावणाची सुरुवात साेमवारने हाेत असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कपालेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या गर्दीच्या दृष्टीने नियाेजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात कपालेश्वर मंदिर पहाटे ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. तसेच दर्शन रांगेसाठी बॅरिके्डससह १०० हून अधिक स्वंयसेवक देखील तैनात असणार आहे. श्रावणातील नियाेजन तसेच भाविकांचा भाविकांचा मंदिर व्यवस्थापनात सहभाग वाढविण्याकरीता देवस्थान व्यवस्थापन समितीची देखील स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड अक्षय कलंत्री, उपाध्यक्ष सुनील पटेल, सचिव अॅड प्रशांत जाधव, विश्वस्त श्रद्धा दुसाने-कोतवाल, रावसाहेब कोशिरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
महादेवासमाेर नंदी नसलेले देशातील एकमेव मंदिर म्हणून कपालेश्वर मंदिर देशभरात प्रसिध्द आहे. श्रावण महिन्यात शहरासह देशभरातील भाविक या मंदिरात दर्शन, अभिषेक तसेच पालखी साेहळ्यात सहभागी हाेण्यासाठी येत असतात. श्रावणी साेमवार, श्रावणी शनिवार या दिवशी तर मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या एक लाखांहून अधिक असते. या श्रावण महिन्यात भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण हाेवू नये यासाठी कपालेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण श्रावण महिना तसेच गणेशाेत्सवापर्यंत मंदिरासह परिसरात विद्यूत राेषणाई करण्यात येणार आहे. श्रावणात पहाटे ४ वाजेपासून मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले असणार आहे. तसेच भाविकांच्या मागणीनुसार संस्थानतर्फे रुद्राक्ष वाटप करण्यात येणार आहे.
धर्मादाय आयुक्तांनी नियुक्ती केल्यानंतर कपालेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टच्यावतीने मंदिर व्यवस्थापन, मंदिरात येणारी देणगी, मंदिर परिसरातील कामाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे २०२२ ते २०२३ या अर्थिक वर्षात संस्थानला १९ लाख ८२ हजार ८०४ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले हाेते. तर एक एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या अर्थिक वर्षात तब्बल ४० लाख ६८ हजार ३६० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या माध्यमातून आगामी काळात भाविकांच्या साेईसाठी भक्त निवास, प्रसादालयाची उभारणी करण्यात येणार आहे.शिवलिंगाची झीज थांबविण्यासाठी करणार वज्रलेपण – कपालेश्वर मंदिरातील शिवलिंगाची मोठ्या प्रमाणावर झिज हाेत आहे. ही झिज राेखण्यासाठी संस्थानच्या वतीने शिवलिंगाचे लवकरच वज्रलेपण केले जाणार आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडून लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.





