अवैध मद्य तस्करी प्रकरणी पाचव्या संशयिताला अटक ! - CHECKMATE NEWS
क्राईम

अवैध मद्य तस्करी प्रकरणी पाचव्या संशयिताला अटक !


पाठलाग करताना पोलीस कर्मचाऱ्याचा झाला होता मृत्यू !
नाशिक : विशेष प्रतिनिधी
अवैधरित्या मद्यसाठयाची वाहतुक करणाऱ्या कारने शासकीय स्कॉर्पिओला चांदवड-मनमाड रोडवर दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचा कर्मचारी जागीच ठार झाला होता. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाचवा संशयित आरोपी जेरबंद केला आहे. भावेशकुमार मोहनभाई प्रजापती (४२, रा. शिवशक्ती इस्टेट, साईव्हिला सोसायटी, ओलपाड, ता. जि. सुरत, राज्य गुजरात) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला तळोदा (नंदुरबार) येथून शिताफीने अटक करण्यात आली आहे. 
               याबाबतचे अधिक वृत्त असे की, ७ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास चांदवड-मनमाड रोडवर अवैधरित्या मद्य साठयाची वाहतुक करणाऱ्या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचा कर्मचारी जागीच ठार झाला होता. तर लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलीस अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते. या घटनेबाबत चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तात्काळ दखल घेवून यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यासाठी जिल्हयासह परराज्यात पथके रवाना केली होती. त्यानुसार पोलिस पथकांनी यापूर्वी गुन्ह्यात संशयित आरोपी देवीश पटेल, अशपाक अली शेख, राहुल सहाणी, शोहेब अन्सारी या चार आरोपींना अटक करून हा गुन्हा उघडकीस आणला होता. 
                या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास रवाना करण्यात आले होते. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नंदुरबार जिल्हयातील तळोदा परिसरात सतत पाळत ठेवून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील गुन्हयाचे दिवशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सामील असलेला व परराज्यातुन महाराष्ट्र राज्यात मद्याची तस्करी करणारा संशयित आरोपी भावेशकुमार मोहनभाई प्रजापती यास शिताफिने ताब्यात घेतले. हा आरोपी हा घटनेच्या दिवशी यातील मुख्य क्रेटा कार सोबत त्याच्याकडील किया सोनेट कारमध्ये मद्यसाठा घेवून अवैधरित्या वाहतूक करत होता. त्याला गाडी थांबविण्याचा इशारा केला असता, तो पोलीसांना हुलकावणी देऊन फरार झाला होता. या आरोपीस वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून, गुन्हयाचा पुढील तपास एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथक करीत आहे. 
             हि कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार गणेश वराडे, मुकेश महिरे, धनंजय शिलावटे, संदीप झाल्टे तसेच तांत्रिक विश्लेषन विभागाचे प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने केली आहे.

Translate »
error: Content is protected !!