सुशोभीकरणाला पुरोहित संघाचा विरोध !
ठिय्या आंदोलन करीत केला विरोध !
नाशिक : गंगा गोदावरी नदीच्या आरतीसाठी चौथरे बांधण्याचे आणि सुशोभीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु करण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी देखील कामाला विरोध दर्शवत पुरोहित संघाने काम बंद पाडले आहे. शनिवारी देखील पुन्हा एकदा चौथऱ्याच्या कामास पुरोहित संघ, अहिल्यादेवी ट्रस्ट, हिंदुत्ववादी संघटना, महाविकास आघाडी पक्षातील विविध राजकीय पदाधिकारी व गोदावरी बचाव समिती यांनी गोदाघाटावर होणाऱ्या बांधकामास विरोध म्हणून हातात फलक घेऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी नदीपात्रात उतरून घोषणाबाजी केली.
राज्य सरकारच्या माध्यमातून वाराणसी व हरिद्वारच्या धर्तीवर शासकीय रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गठीत करून त्यांच्यामाध्यमातून गोदावरी महाआरती सुरु करण्यात आली आहे. या समितीला पुरोहित संघाकडून पहिल्यापासून विरोध होत आहे. मात्र या शासकीय महाआरटीला भव्यदिव्य स्वरूप तसेच तिचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता राज्य सरकारने तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून दुतोंड्या मारुती परिसरातील अहिल्याबाई होळकर घाट येथे चौथरे, गोदाघाट परिसरात लाइटिंग व सुशोभीकरण तर शहरातील विविध भागात एलईडी स्क्रीन उभारणी करण्यात येणार आहे. या महाआरती करिता दुतोंड्या मारुती परिसरातील अहिल्याबाई होळकर घाट येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चौथऱ्यांसह इतर सुशोभीकरणाचे काम जून महिन्यात सुरु करण्यात आले होते. यावेळी पुरोहित संघाने याला विरोध केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्याभरापूर्वी याठिकाणी ठेकेदाराकडून पुन्हा काम सुरु केल्यानंतर पुरोहितसंघ आणि काही स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत काम बंद पाडले होते.
दुसरीकडे मात्र, गोदाघाट परिसरात काही वर्षांपासून स्मार्टसिटी कडून देखील अनेक कामे करण्यात आली असून त्या कामांमुळे अनेक ऐतिहासिक वारसा स्थळांची मोडतोड झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. खरंतर याप्रकरणी काही पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नदीपात्रात तसेच निळ्यारेषेत कोणत्याही प्रकारचे तात्पुरता किंवा पक्के बांधकाम करता येणार नसल्याचे आदेशाची प्रत तसेच अवमान नोटीस विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्मार्टसिटी यासह इतर संबंधित विभागांना दिली होती. गोदाघाट परिसरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करावयाचे असल्यास न्यायालयाची अथवा न्यायालयाने नेमून दिलेल्या समितीची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र न्यायालयाची अथवा समितीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गोदाघाट परिसरात बांधकाम सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून देण्यात आलेल्या पत्रांची विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दखल घेत गेल्या आठवड्यात सुरु केलेले काम संबंधित विभागाला तात्काळ बंद करण्यास सांगितले होते.
शनिवार दि. २० रोजी सकाळी पुन्हा एकदा पुरोहित संघाने या कामाला विरोध करण्यासाठी रामकुंड येथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी ठेकेदार हटवा गंगाघाट वाचवा, गोदा बचाव, मंदिर बचाव, प्रदूषण मुक्त गोदावरी झालीच पाहिजे अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात माजी आ. वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, भक्तीचरणदास महाराज, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, उद्धव पवार, सतीश शुक्ल, प्रतीक शुक्ल, आलोक गायधनी, कल्पेश दिक्षित, कल्पना पांडे, अहिल्यादेवी ट्रस्टचे बापू शिंदे, पुरोहित यांच्यासह परिसरातील व्यावसायिक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पंचवटी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





