आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मंदिरात महापूजा संपन्न ! - CHECKMATE NEWS
धार्मिकमहाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मंदिरात महापूजा संपन्न !


नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील अहिरे दाम्पत्याला मान !
नाशिक – विशेष प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी पहाटे सपत्नीक संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील अंबासन (ता. सटाणा) येथील अहिरे दाम्पत्याची निवड करण्यात आली होती.
               मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, मानाचे वारकरी बाळू शंकर अहिरे (५५) व आशाबाई बाळू अहिरे (५०) यांच्या हस्ते महापूजा पार पडली. मानाचे वारकरी म्हणून दर्शन रांगेतून भाविकाची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा मान नाशिक जिल्ह्यातील बाळू अहिरे व आशाबाई अहिरे यांना मिळाला. अहिरे पती-पत्नी १६ वर्षापासून विठुरायाची यात्रा करीत आहेत. मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, “हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या आणि  सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर” असे साकडे विठ्ठलाच्या चरणी घातले.
 
नाशिकमध्ये विठूनामाचा गजर : आषाढी एकादशीनिमित्त नाशिकमध्येही सकाळपासूनच भक्तिमय वातावरण आहे. शहरातील विठ्ठल मंदिरांसह श्री काळाराम, कपालेश्‍वर आदी लहान मोठ्या मंदिरांत दर्शनासाठी तसेच गोदाकाठी स्नानासाठी भाविकांची गर्दी होती. नाशिकमधील प्राचीन श्री विठ्ठल मंदिर, कॉलेज रोडवरील नामदेव विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रविवार पेठेतील हिरालाल लेन येथील श्री विठ्ठल माऊली भक्त मंडळातर्फे आषाढीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Translate »
error: Content is protected !!