एक लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत ! जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक !
पंचवटी : (वा.) दुचाकीला कट मारून मारहाण करीत जबरी लूट करणाऱ्या दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयिताकडून एक मोबाईल, दुचाकी असा एकूण एक लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन दिनकर पोघे (३३,रा. हाउस नं. २१ गोकुळ धाम रो. हाउस, वृदावन नगर, जत्रा नांदुर लिंक रोड, नाशिक) हे १६ जुन २०२४ रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घरी जात होते. यावेळी मुंबई आग्रा महामार्ग सर्व्हिस रोडवरील हॉटेल शिवगंगा समोर दोन संशयितांनी दुचाकीस कट लागल्याच्या कारणावरून पोघे याना मारहाण करीत त्यांचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून नेला होता. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक अधिकारी व कर्मचारी करीत होते. दरम्यान या संशयितांचा माग काढताना गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार दादासाहेब वाघ व निलेश काटकर यांना माहिती मिळाली की, जबरी चोरीमधील संशयित हे हिरावाडीतील स्वामी समर्थ केंद्र येथे येणार आहे. माहिती मिळताच आडगाव गुन्हे शोध पथकाने सापळा रचुन संशयित तुषार नाना वाघ (२३) आणि विशाल भागोजी मोरे, (२१, दोघे रा. शिवकृपा नगर, स्वामी समर्थ केंद्राजवळ, हिरावाडी नाशिक) यांना ताब्यात घेतले. या संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. या संशयितांनी जबरी चोरी केलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोसा क्रमांक एम. एच. ४८ डी. ए. ४३९९ असा एकुण एक लाख दहा हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हि कामगिरी आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक निखील बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, दादासाहेब वाघ, पो. अंमलदार सचिन बाहिकर, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख, महिला पोलीस अंमलदार वैशाली महाले व तांत्रिक विश्लेषन शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.





