अवलिया करणार सायकलीवर १२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा !
१३ राज्य, अकरा हजार किलोमीटर आणि ११५ दिवसांची असणार यात्रा !
नाशिक : पंचवटी परिसरातील सायकलिस्ट असलेल्या भोलेभक्ताने हिंदू धर्मात अंत्यंत पवित्र आणि मुख्य मानल्या गेलेल्या १२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा सायकलीवरून करण्याचा मानस केला आहे. त्यांची ही यात्रा १६ सप्टेंबरपासून नाशिकमधून सुरु होणार आहे. १३ राज्यांमधून अकरा हजार किलोमीटरची त्यांची ही यात्रा असणार असून ११५ दिवसात ही यात्रा पूर्ण करण्याची तयारी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्याबाबतचे नियोजन आणि थांबण्याचे टप्पे तयार करण्यात आले आहे. २० टप्प्यांमध्ये सलग हि यात्रा सुरु राहणार आहे. हमारा देश, हमारा नाम, एक भारत, श्रेष्ठ भारत आणि राष्ट्रीय एकता अभियान हा संदेश घेऊन ही यात्रा केली जाणार असल्याचे महेश जमदाडे यांनी सांगितले आहे. शनिवारी नाशिकच्या त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले आहे.
देवाची भक्ती भक्त आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करीत असतो. यामध्ये भाव भक्तीसह त्यांच्या आर्थिक सुबकता प्रमाणे भक्तीचा मार्ग निवडलेला आपल्याला दिसून येत असतो. मात्र, भक्तांची भक्ती देवाला प्रसन्न करण्यासाठी काय करेल याचे अनेक उदारहरने ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेली आहे. तर आजच्या कलियुगात देखील अनेक भक्त लोटांगण घालत दर्शनाला जाणे, अनवाणी पायाने दर्शनाला जाणे, वर्षभर उपवास करणे, केस न कापणे, मांसाहार न करणे अशा एकनाअनेक पद्धतीने भक्तीचे मार्ग जोपासले जात असतात.
अशाच पद्धतीने ग्रेट सायकलिस्ट म्हणून सर्वांना परिचित असलेले भोले-भक्त महेश अरविंद जमधाडे यांनी हमारा देश, हमारा नाम, एक भारत, श्रेष्ठ भारत आणि राष्ट्रीय एकता अभियान हा संदेश घेऊन या यात्रेचा मानस केला आहे. त्यांनी यापूर्वी ४ हजार ४०० किलोमीटर डोंगर दऱ्यांमधून प्रवास करीत अमरनाथ येथील बाबा बर्फानीचे दर्शन घेतले होते. हि यात्रा त्यांनी २२ दिवसात पूर्ण केली होती. तसेच, अष्टविनायक यात्रा चार दिवसात सायकलीवर पूर्ण केली असून सायकलीवर ६ वेळा भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. तसेच, शेगाव आणि पंढरपूर वारी देखील त्यांनी केली आहे. आता त्यांनी आणखी एक मोठे धाडस, प्रचंड इच्छाशक्ती मनात घेऊन ११ हजार किलोमीटर प्रवास असलेली १२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रा पूर्ण करण्यास मानस केला आहे. त्यांच्या या यात्रेला अनेकांनी आपल्या शुभेच्छा दिल्या असून त्यांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
आडगाव शिवारातील गार्डन काउंटी सोसायटी मध्ये राहणारे महेश जमधाडे यांनी आजपर्यंत अमरनाथ, भीमाशंकर अश्या अनेक यात्रा सायकलवर पूर्ण केल्या आहे. १६ सप्टेंबर ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान ११५ दिवसांची १२ ज्योतिर्लिंग व चार धाम यात्रा करण्यास निघणार आहे. ही यात्रा १३ राज्यांमधून साधारणत: ११ हजार किलोमीटरची असणार आहे. रोज साधारण १०० ते १२५ किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. यासाठी त्यांनी सोबत टेन्टचे साहित्य घेतले असून त्यांचा मुक्काम हा सामाजिक मंदिर, पेट्रोल पंप, धर्मशाळा अशा ठिकाणी असणार आहे.
त्यांचा प्रवासाचा पहिला टप्पा हा नाशिक ते हरिद्वार असा १४ दिवसांचा आणि १ हजार ४१५ किलोमीटरचा असणार आहे. दुसरा टप्पा हरिद्वार ते गोरखपूर हा ७ दिवसांचा आणि ७४६ किलोमीटरचा असणार आहे. तिसरा टप्पा गोरखपूर ते काठमांडू (पशुपतीनाथ) ४ दिवसांचा आणि ३७० किलोमीटरचा असणार आहे. चौथा टप्पा काठमांडू ते गोपालगंज ३ दिवसांचा आणि २३९ किलोमीटरचा असणार आहे. पाचवा टप्पा गोपालगंज ते देवघर ४ दिवसांचा आणि ३८२ किलोमीटरचा असणार आहे. सहावा टप्पा देवघर ते पुरी ७ दिवसांचा आणि ६८५ किलोमीटरचा असणार आहे. सातवा टप्पा पुरी ते वाराणसी ९ दिवसांचा आणि ९२१ किलोमीटरचा असणार आहे. पुढे वाराणसी ते उज्जैन हा ९ दिवसांचा ९०२ किलोमीटर, उज्जैन ते ओंकारेश्वर २ दिवस १४१ किलोमीटर, ओंकारेश्वर ते द्वारका ८ दिवस ७८० किलोमीटर, द्वारका ते सोमनाथ २ दिवस २५० किलोमीटर, सोमनाथ ते घृष्णेश्वर ८ दिवस ७४२ किलोमीटर, घृष्णेश्वर ते वैजनाथ ३ दिवस २४८ किलोमीटर, परळी वैजनाथ ते औंढा नागनाथ १ दिवस ११९ किलोमीटर, औंढा नागनाथ ते श्री शैल्यम ६ दिवस ५६२ किलोमीटर, श्री शैल्यम ते रामेश्वरम १० दिवस ९५१ किलोमीटर, रामेश्वरम ते पंढरपूर १२ दिवस १ हजार १७२ किलोमीटर, माळशिरस ते भीमाशंकर ३ दिवस २६१ किलोमीटर, भीमाशंकर ते घारगाव १ दिवस १०० किलोमीटर आणि घारगाव ते नाशिक १ दिवस १०८ किलोमीटर असा २० टप्प्यांमध्ये प्रवास करीत ते नाशिकला पोहचणार आहे.





