जिल्हाधिकारी यांना तलाठी संघाच्या वतीने काम बंद आंदोलनाचे निवेदन ! - CHECKMATE NEWS
ठळक बातम्यानाशिकसरकारी माहिती

जिल्हाधिकारी यांना तलाठी संघाच्या वतीने काम बंद आंदोलनाचे निवेदन !


सर्व्हर जाम ; पीक विम्यासाठी शेतकरी आणि तलाठी मध्ये वाद !

पंचवटी : (वा.) तलाठी संघटनेच्या विविध मागण्या आणि क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करतांना येणार्‍या अडचणी बाबत जिल्हाधिकारी जलच शर्मा यांना नाशिक तलाठीच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. सर्व्हर डाऊन मुळे शेतकरी आणि तलाठी यांच्यात वाद होत असल्याने यावर तोडगा काढावा आणि तलाठी कार्यालयामध्ये साधन सामग्री देण्यात यावी या देखील मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावर निर्णय न झाल्यास येत्या आठ दिवसानंतर काम बंद करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

तलाठी अणि मंडळ अधिकारी यांना उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालयातील वहिवाट, अतिक्रमण यासारख्या कामकाजात प्राधिकृत करून नाहक पणे आर्थिक खर्चाला बळी पडत असून संबंधित केसेसची सखोल माहिती नसल्याने न्यायालयीन कामासाठी नायब तहसीलदार अथवा अव्वल कारकून यांना प्राधिकृत करून पाठवावे.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून ऑनलाईन कामे करतांना सर्व्हर स्पीड अत्यंत स्लो असल्याने नाहक तलाठी कार्यालयात शेतकर्‍यांना बसून राहावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या करण्याचे दिवस असल्याने त्याचबरोबर शासनाच्यावतीने एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ७/१२ घेण्यासाठी येत असून तलाठी आणि शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होत आहे. सर्व्हर डाऊनमुळे तलाठी व मंडळ अधिकारी बदनाम होत आहेत. तसेच वरिष्ठ कार्यातून वारंवार ई-फेरफार, नोटीस तयार करणे, प्रलंबित फेरफार, ई-चावडी, ई-हक्क या सारख्या कामाचा आढावा घेण्यात येत असल्याने ऑनलाईन कामासाठी पुढील ८ दिवसात सर्व्हर सुधारणा न झाल्यास ऑनलाईन कामकाज बंद करून आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका तलाठी संघटनेने घेतलेली आहेत.

२०१६ पासून संगणकीकृत कामकाजासाठी देण्यात आलेले लॅपटॉप आणि प्रिंटर कालबाह्य झालेली साधन सामग्री बदलून मिळावी. ग्रामीण आणि शहरी भागात तलाठी नवीन कार्यालयासह टेबल, खुर्च्या, सिलिंग फॅन, शेतकर्‍यांना बसण्यासाठी बाकडे ई. तलाठी कार्यालयात आवश्यक वस्तूची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर अनेक तलाठी याच्याकडे अतिरिक्त भार असून इतर वरिष्ठ कार्यालयात वर्ग केलेल्या तलाठी यांना मुळ रजे वर सोडण्याची मागणी करण्यात आली.

दैनंदिन पर्जन्यमान आकडेवारी बाबत मॅन्युअल पर्जन्य मापक यंत्र न वापरण्याबाबत सांगण्यात आले. आगामी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत अथवा कोणत्याही निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मतदान कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था प्रत्येक वेळी तलाठी यांना करावी लागते. यासाठी कोणताही अतिरिक्त भत्ता मिळत नसल्याने, यापुढे भोजनाची व्यवस्था न करण्याचा निर्णय तलाठी संघाच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना निवेदनात द्वारे देण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना कार्याध्यक्ष नीलकंठ उगले, अध्यक्ष संजय गाडे, महिला उपाध्यक्ष प्रीती अग्रवाल, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख दीपक मोठे, तांत्रिक सहाय्यक किशोर नाथबुवा, निमंत्रित सदस्य चारूशीला पवार, विशाखा गोसावी, शितल अहिरे, माधुरी मार्कंड, वसंत धूमसे, शिरसाट, ज्ञानेश्वर पगार, संतोष हिरे, संतोष जोशी आदी उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!