चुंभळेंकडून पिंगळेंना वाढदिवसानिमित्त अविश्वास ठरावाचे गिफ़्ट !
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अखेर सत्तांतर !
पंधरा विरुद्ध शून्य मतदानाने अविश्वास ठराव मंजूर !पिंगळे, खांडबहाले, कड यांची विशेष सभेला दांडी !
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. या विशेष सभेत पंधरा संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने स्वाक्षरी केल्याने पंधरा विरुद्ध शून्य अशा पद्धतीने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे देविदास पिंगळे यांचे सभापती पद कायदेशीररित्या बरखास्त झाले आहे. नवीन सभापती निवडीसाठी बुधवार दि. १९ रोजी सभा बोलाविण्यात आली आहे. या विशेष सभेला पिंगळे सह त्यांचे दोन संचालक गैरहजर राहिले. सध्या बाजार समितीच्या प्रभारी सभापती पदाचा पदभार उप सभापती विनायक माळेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पिंगळे यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच अविश्वास ठराव जिंकल्यामुळे चुंभळे यांनी एकप्रकारे पिंगळे यांना वाढदिवसाची भेट दिल्याची चर्चा बाजरी समितीमध्ये रंगली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीमधील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येत असल्याने बाजार समितीचे नाव मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. यापूर्वी देखील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून बाजार समितीमध्ये सत्तांतर नाट्य रंगलेले सहकार क्षेत्राने बघितले आहे. यावेळी देखील देविदास पिंगळे यांच्या मनमानी कारभाराला आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या संचालकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी मंगळवार दि. ११ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेसाठी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या गटातील सहा संचालक आणि पिंगळे गटातून फुटून चुंभळे गटात गेलेले नऊ संचालक अशा पंधरा संचालकांना पोलीस बंदोबस्तामध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य कार्यालयात आणले गेले. त्यानंतर अकरा वाजता प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे कामकाज सुरु करण्यात आले. यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने माजी सभापती शिवाजी पांडुरंग चुंभळे, संपतराव महादू सकाळे, विनायक शंकर माळेकर, युवराज बाबुराव कोठुळे, सविता संजय तुंगार, जगन्नाथ हरिभाऊ कटाळे, भास्कर गोपाळ गावित, संदीप शिवाजी पाटील, चंद्रकांत दशरथ निकम, जगदीश अशोक अपसुंदे, राजाराम धोंडीराम धनवटे, तान्हाजी पांडुरंग करंजकर, कल्पना शिवाजी चुंभळे, धनाजी पुंजाजी पाटील, प्रल्हाद त्रंबक काकड या पंधरा संचालकांनी मतदान केले. तर देविदास पिंगळे, उत्तमराव खांडबहाले, निर्मला कड हे संचालक या सभेला अनुपस्थित राहिल्याने अविश्वास ठराव पंधरा विरुद्ध शून्य असा मंजूर करण्यात आला. तर उपसभापती विनायक माळेकर यांच्याकडे प्रभारी सभापती पदाची सूत्रे देण्यात आली. नव्या सभापती निवडीसाठी बुधवार दि. १९ रोजी सभा होणार आहे.
देविदास पिंगळे यांचा बुधवार दि. १२ रोजी वाढदिवस आहे. मात्र, शिवाजी चुंभळे यांनी ऐन त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर अविश्वास ठराव जिंकत पिंगळे यांना सभापती वादावरून पायउतार करीत वाढदिवसाची भेट दिल्याची खुमासदार चर्चा बाजार समितीमध्ये रंगली होती.
तालुका संघही जाणार – बाजार समितीतील पिंगळे विरुद्ध चुंभळे या सत्तांतरानंतर त्याचे पडसाद तालुका शेतकी संघात देखील लवकर बघायला मिळणार आहे. त्यामुळे पिंगळे यांचे वर्चस्व असलेल्या सहकार क्षेत्रात त्यांची झोळी रिकामी होणार असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.
बाजार समिती शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांचे हित जपायचे सोडून बाजार समिती विकायला निघालेल्या पिंगळे याना आम्ही सर्व संचालकांनी एकत्र येत बाजूला केले आहे. भविष्यात फक्त बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेऊन बाजार समितीचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. :शिवाजी चुंभळे, माजी सभापती, नाकृउबा समिती





शिवाजी चुंभळे, माजी सभापती, नाकृउबा समिती