दंगलप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला अटक !
दंगलीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे उघड !
नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजरंगवाडी येथे झालेल्या दोन गटातील दंगलीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग उघड झाला आहे. आडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी दंगलीच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याने तसेच, दंगलीमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या अटकेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे सराईत गुन्हेगारांसोबत लागेबांधे असल्याचे उघड झाल्याची चर्चा सुरु झाली
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार दि. १४ रोजी बजरंगवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास दोन गटात दंगल उसळली होती. या दंगलीमध्ये दोन्ही गटातील संशयितांकडून धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्यांचा वापर करीत एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. तसेच, परिसरातील वाहनांची तोडफोड करीत तेथून जाणाऱ्या तिघांवरही प्राणघातक हल्ला करीत त्यांच्याही वाहनाची तोडफोड केली होती. या दंगलप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी दोन्ही गटातील संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, दंगल करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता.
या दंगलप्रकरणी बजरंगवाडी परिसरातील अभिषेक जाधव, राहुल ब्राह्मणे, नवाज खान व त्याच्या इतर ५ ते ६ साथीदारांसह खडकाळी येथील जुबिन मोहम्मद सैय्यद, मतीन रुबाब शेख, जफर शेख, इसुफ शेख, रजा व इतर ६ ते ७ संशयित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गटांमधील ८ संशयितांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यातील सात जणांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
तसेच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता घटना घडली त्यावेळी घटनास्थळी आडगाव पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अंमलदार इरफान मन्सूर शेख हा देखील घटनास्थळी हजर असल्याचे स्पष्ट झाले. सखोल तपासात इरफान शेख सोबत इतर संशयित आरोपींनी मोबाइलवरून संपर्क साधून संवाद साधल्याचेही उघड झाले. त्यामुळे या गुन्ह्यात इरफानचाही सक्रीय सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी संशयित इरफान शेख याला दंगलप्रकारणी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत (दि.२०) पोलिस कोठडी सुनावली आहे. इरफान शेख यास शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.





