चेकमेट न्यूजच्या वृत्तावर पोलीस आयुक्तांचे शिक्कामोर्तब ! - CHECKMATE NEWS
शहर

चेकमेट न्यूजच्या वृत्तावर पोलीस आयुक्तांचे शिक्कामोर्तब !


पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या !

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस ठाणे निहाय मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये गंगापूर, आडगाव, म्हसरूळ, सातपूर, नाशिकरोड, मुंबईनाका, अंबड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली असून यातील काहींना पोलीस ठाणे मिळाले तर काहींना नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होणार याबाबत चेकमेट न्यूजने बुधवार दि. १७ रोजी सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शुक्रवार दि. १९ रोजी बदल्यांचे आदेश काढल्याने या वृत्तावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. 

             गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाचे सत्र सुरु झाले आहे. त्यातच हातात कोयते घेऊन दहशत माजविणे, जबरी लूट, चैन स्नॅचिंग, घरफोडी, दुचाकी चोरी या गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शहरात अवैध धंदे वाढले असून याविरोधात आवाज उठविणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना थेट पोलीस ठाण्याबाहेर मारहाण करण्याचे प्रकार घडू लागले होते. यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर गेल्याचे दिसू लागल्याने नाशिककरांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत अशा ढिसाळ कारभारामुळे शहरात वाढलेल्या गुन्हेगारीचे वाभाडे नागरिकांनी सोशल मीडियावर काढण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ॲक्शन मोडमध्ये येऊन त्यांनी अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहे. या बदलीच्या वृत्ताबाबत चेकमेट न्यूजने सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. 
                यामध्ये गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची बदली नाशिकरोड पोलीस ठाण्यात दुय्यम निरीक्षक म्हणून करण्यात आली असून त्यांच्या जागी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांची बदली करण्यात आली आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांची वर्णी लागली आहे. अंबड पोलीस ठाण्यातील दुय्यम पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश होईपर्यंत अंबड पोलीस ठाण्याचा कारभार देण्यात आला आहे. आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना आर्थिक गुन्हे शाखा (इओडब्लू) येथे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून देण्यात आले असून त्यांच्या जागी नव्याने हजर झालेले सचिन खैरनार यांना आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून देण्यात आले आहे. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोहन माछरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी उपनगर पोलीस ठाण्यातील दुय्यम पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना पुन्हा एकदा सातपूर पोलीस ठाणे बहाल करण्यात आले आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांची नियंत्रण कक्षात बदली तर त्यांच्या जागी मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून तर त्यांच्या जागी भद्रकाली पोलीस ठाण्यातील दुय्यम पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांची वर्णी मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदी लागली आहे. दुय्यम विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्याकडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एएनसी आणि अतिरिक्त कार्यभार विशेष शाखेचा देण्यात आला आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्यातील दुय्यम पोलीस निरीक्षक यांची भद्रकाली पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांना उपनगर पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून देण्यात आले आहे. इओडब्लूचे दुय्यम पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांना सरकारवाडा येथे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून देण्यात आले आहे. नव्याने हजर झालेले सुशील जुमडे यांना पंचवटी पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून देण्यात आले आहे. 

Translate »
error: Content is protected !!