गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या परराज्यातील मायलेकी गजाआड
सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे उलगडा
नाशिक : प्रतिनिधी
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे दागिने चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील मायलेकी आरोपींना पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ५६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निमाणी बसस्थानक, मार्केट यार्ड परिसर तसेच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या दागिने चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गस्त वाढविणे, साध्या वेशात पेट्रोलिंग करणे आणि संशयितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला होता.
पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फिर्यादी भाजीपाला खरेदी करण्यासाठी पंचवटी भाजीपाला मार्केट येथे गेले असताना दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेत त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरी करून नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित महिलांचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे उषा किशोर सकटे (५०, रा. देवास, भोपाल चौराया, जुन्या झोपडपट्टीजवळ, ता. देवास, जि. इंदूर, मध्यप्रदेश) आणि पूर्णिमा किशोर सकटे (३०, रा. सप्तशृंगी काली माता मंदिराजवळ, भोपाल चौराया, जुन्या झोपडपट्टी, ता. देवास, जि. इंदूर, मध्यप्रदेश) अशी आहेत.
आरोपी महिलांकडून पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील २ लाख ५० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तसेच ३०० रुपये किमतीची पर्स जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली असून त्यामधील ६ हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार (गुन्हे), पोलीस निरीक्षक नितीन आंधळे (प्रशासन), पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सतीश शिरसाठ, पोहवा अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, पोना जयवंत लोणारे, पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप, पोअं युवराज गायकवाड, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, अमोल देशमुख, अंकुश काळे, नितीन पवार, गणेश आगोणे, मपोअं रोहीणी भोईर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार कुलकर्णी करीत आहेत.





